कस्टम मुंबई आणि आर्टलेरी सेंटर नाशिक संघात अंतिम लढत ! दिल्ली पोलिसांचे स्वप्न भंगले
गुरुवारी अंतिम सामन्यात जिल्हाधिकारी, आयुक्त आणि पोलीस अधीक्षक प्रमुख पाहुणे.
रविंद्र सिंघ मोदी
नांदेड दि. 28 :
येथे सुरु आलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एन्ड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या गुरुवारी सकाळी खेलविण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात कस्टम मुंबई विरुद्ध आर्टलेरी सेंटर नाशिक संघात अंतिम लढत होईल. दोन्ही संघांनी आज आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना नमवून अंतिम फेरी गाठली. उद्या सकाळी 19.30 वाजता अंतिम सामना खेळला जाईल. अशी माहिती दुष्ट दमन क्रीडा व युवक मंडळाचे प्रमुख व हॉकी कमेटीचे प्रमुख, नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी सायंकाळी येथे दिली.
बुधवारी दुपारी उपांत्य फेरीचे दोन हॉकी सामने खेळले गेले. पहिला सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि ईएमई जालंधर संघात खेळला गेला. नाशिक संघाने 4 विरुद्ध 1 अशा गोल अंतराने जालंधर संघाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. वरील सामन्यात नाशिक तर्फे संजय टीडू, मनप्रीतसिंघ, मनप्रीतसिंघ कर्णधार, लालप्रीत सिंघ यांनी प्रत्येकी एक एक गोल केले. यातील दोन गोल पेनल्टी कार्नर मध्ये तर दोन गोल मैदानी स्वरुपाचे होते. जालंधर संघाने ख्यातीनुसार खेळ केले नसले तरी खेळाच्या 56 व्या मिनिटाला रोहित याने एक गोल करून संघाचे खाते उघडले.
दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात कस्टम मुंबई आणि सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली या दोन संघात सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांनी एकमेकाविरुद्ध गोलसाठी अनेक हल्ले चढवले. खेळाच्या 32 व्या मिनिटाला मुंबई संघाच्या जयेश जाधव (कर्णधार) यांने पेनल्टी कार्नर मध्ये गोल करून संघास आघाडी मिळवली. दिल्ली पोलिसांनी 42 व्या मिनिटाला हरीश पाल च्या मैदानी गोलाने बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले पण गुणतालिकेत परिवर्तन घडू शकले नाही. त्यामुळे निकाल लावण्याच्यासाठी पेनल्टी शूटआउट प्रणालीने निकाल काढण्यात आले. यात कस्टम मुंबई संघाने 3 विरुद्ध 2 गोल अंतराने सामना जिंकून अंतिम फेरीसाठी पात्रता सिध्द केली. आजच्या सामन्यासाठी पंच म्हणून रमीज कुरैशी, धीरज पृथ्वीराज चव्हाण, जीशन मेहबूब शेख, सुमित मोहिते, इंदरपालसिंघ, उमेश भीने, हार्दिक भंसोले, अय्याज हनीफ खान यांनी काम पाहिले. उद्या सकाळी 8.30 वाजता तिसऱ्या स्थानासाठी ईएमई जालंधर आणि सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली यांच्यात सामना खेळला जाणार आहे.
पारितोषिक वितरण :
उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यातील विजेत्यांना जिल्हाधिकारी नांदेड श्री अभिजीत राऊत, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनील लहाने, नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन हॉकी कमेटीचे प्रमुख स. गुरमीतसिंघ नवाब, जीतेन्द्रसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, महेंद्रसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलो, अमरदीप सिंघ महाजन, महेंद्रसिंघ गाडीवाले, विजय नंदे यांनी केले आहे.