आर्टलेरी सेंटर नाशिक विजेता तर मुंबईकडे उपविजेते पद ईएमई जालंधर तिसऱ्यास्थानी
हॉकी खेळाडूंसाठी सिंथेटिक टर्प उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न : आयुक्त डॉ लहाने
रविंद्रसिंघ मोदी
नांदेड दि. 29 डिसेम्बर :
अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात विजेत्यास साजेल असे खेळाचे प्रदर्शन घडवत आर्टलरी सेंटर नाशिक संघाने लगोपाठ दुसऱ्या वर्षी प्रथमस्थान पटकावला. गुरुवार, दि. 29 डिसेम्बर रोजी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आर्टलेरी नाशिक संघाने 3 विरुद्ध 2 गोल अंतराने कस्टम मुंबई संघावर मात करून प्रथम विजेत्याची ट्रॉफी उचलली. तर तिसऱ्या स्थानासाठी पार पडलेल्या सामन्यात ईएमई जालंधर संघाने सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली संघाला 2 विरुद्ध 0 गोल अंतराने नमवून तीसरेस्थान राखले.
गुरुवारी सकाळी श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जयंती निम्मित गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करण्यात आले. टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यासाठी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनील लहाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, स्थायी समितीचे माजी सभापती श्री अमितसिंह तेहरा, नगरसेवक श्री सुरेश हटकर, गुरुद्वारा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष गुरचरनसिंघ घडीसाज, माजी सदस्य वरियामसिंघ नवाब, माजी सचिव रणजीतसिंघ कामठेकर, भागिन्दरसिंघ घडीसाज, रुपिंदरसिंघ शाहू, रणजीतसिंघ चिरागिया, दीपसिंघ फौजी, दर्शनसिंघ सिद्धू, जोगिंदरसिंघ खैरा सह मान्यवरांची उपस्थिती होती. दुष्ट दमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब, जितेंदरसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, जसपालसिंघ काहलो, महेंद्रसिंघ लांगरी, जसबीरसिंघ चीमा, महिंदरसिंघ गाडीवाले, विजय नंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केले. प्रथम विजेता संघास रोख एक लाख रूपये बक्षीश आणि गोल्ड व सिल्वर कप रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आर्टलेरी सेंटर नाशिक संघास पहिला पारितोषिक जल्लोषाच्या वातावरणात प्रदान करण्यात आला. दूसरा पारितोषिक कस्टम मुंबई संघास रोख 50 हजार रूपये आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तीसरे बक्षीश रोख 15 हजार व स्मृतिचिन्ह ईएमई जालंधर संघास प्रदान करण्यात आले.
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनील लहाने म्हणाले की, नांदेड मध्ये श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जयंती पर्वास समर्पित गोल्ड आणि सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे आयोजन सतत 49 वर्षापासून होत आहे ही बाब शहरासाठी अभिमानास्पद अशी आहे. हॉकी स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष माजी नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांचे क्रीडा क्षेत्रासाठी देण्यात येत असलेले योगदान मोठे आहे. दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तसेच नांदेडच्या सेवाभावी खेळाडूंनी केलेले परिश्रम दिसून येत आहे.
डॉ लहाने पुढे म्हणाले की मागील काही वर्षापासून खालसा हायस्कूलच्या मैदानावर सिंथेटिक टर्प प्रणालीचे मैदान तयार करण्यात यावे अशी मागणी होत आहे. महानगर पालिका आणि गुरुद्वारा सचखंड बोर्ड संयुक्त रित्या काय करू शकतात यासाठी मी व्यक्तिगत रित्या लक्ष्य घालीन. बोर्डाचे प्रशासक यांच्या सोबत चर्चा करून मैदानाविषयी तोडगा काढण्याचे प्रयत्न व्हावे. नांदेडच्या हॉकी खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात या दिशेने पुढे प्रयत्न केले जाईल. येत्यावर्षी स्पर्धेचे 50 वें वर्ष असल्याने स्पर्धेचे स्वरुप व्यापक होईल यात शंका नाही. त्यापूर्वी खालसा हायस्कूल मैदानावर साधन सुविधांची पूर्तता करण्याविषयी पाठपुरावा करण्यात येईल असेही ते म्हणाले. स. गुरमीतसिंघ नवाब, स. रविंद्रसिंघ मोदी, डॉ जुझारसिंघ सिलेदार, हरनामसिंघ मल्होत्रा, खेमसिंघ पोलीस, नरिंदरसिंघ धालीवाल व इतर खेळाडूंनीही खालसा हायस्कूल मैदानावर एसो टर्प किंवा ग्रास मैट ग्राउंड तयार करण्यात यावा अशी मागणी लावून धरली.
स्पर्धेच्या आयोजनात सहकार्य केल्या बद्दल गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, गुरुद्वारा श्री लंगर साहिब नांदेड, गुरुद्वारा श्री नानक झीरासाहिब बीदर, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आणि देणगीदारांचे तसेच पत्रकार आणि मिडियाचे आभार व्यक्त करण्यात आले.