आगामी निवडणुकीत बालाजी पाटील खतगांवकरांना निवडून आणा : आनंदराव अडसूळ
मुखेड : दिनांक ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मुलांचे हायस्कुल मैदान, मुखेड येथे आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी समाज जागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यापूर्वी बा-हाळी नाका ते जिल्हा परिषद मुलांचे हायस्कुल मैदान, मुखेडपर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. आदिवासी समाजातील चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. फटाक्यांची आतषबाजी करत जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
या मेळाव्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळाले पाहिजे, मराठवाडयातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातींना १९५० पूर्वीच्या, नोंदी कोळी आढळल्या तरी टी.एस.पी. क्षेत्रातील लोकाप्रमाणे कोळी नोंदीवरुण जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अभियांत्रीकी व वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाण पत्राशिवाय प्रवेश देण्यात यावा, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय बिगर आदिवासी अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावे. तसेच समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाचे नियम व निकष सारखेच असावेत, आदिवासी क्षेत्रातील समाजाला देण्यात येणाऱ्या अदिवासी योजनांचा लाभ OTSP क्षेत्रातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला विनाविलंब देण्यात याव्यात, अश्या मागण्या श्री. संजय यल्लमवाड यांनी मांडल्या.
श्री.विजयकुमार गावित यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नावर सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले. “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बालाजी पाटील खतगांवकर दिवसरात्र काम करतात. लोकांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सहज सुटतात. त्यांना आपले सर्व प्रश्न माहिती आहेत. ते आपले प्रश्न नक्कीच मार्गी लावू शकतात. त्यामुळे काहीही करून आपल्याला बालाजी पाटील खतगांवकर यांना निवडून आणायचे आहे. हा मेळावा महादेव कोळी समाज व पोट जातींसाठी आहे. लवकरच या समाजाचे प्रश्न सुटतील,” असे आश्वासन आनंदराव अडसूळ यांनी दिले.
“आदिवासी समाजाची सव्वा कोटी संख्या आहे. आदिवासी समाजातील प्रश्नांसाठी दोन वेळा राज्य सरकारने बैठका घेतल्या. शासन नक्कीच या समाजाच्या प्रश्नांचा विचार करेल. जिथे उजेड गेला नाही तिथे पणती घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. माय- माऊलींचा उत्कर्ष करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे,” असे बालाजी पाटील खतगांवकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. आनंदराव अडसूळ (माजी खासदार तथा अध्यक्ष, राज्य अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्र राज्य), श्री. बालाजी पाटील खतगांवकर (मा. खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), श्री. अशोक पाटील रावीकर (मा. सभापती पंचायत समिती, मुखेड), श्री. रमेश पिठ्ठलवाड (आदिवासी कोळी समाज अभ्यासक), सौ. गीतांजलीताई शिंदे (महिला नेत्या, आदिवासी कोळी समाज), श्री. रमेश बोईनवाड, श्री. मधुकर गिरगावकर (सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता), श्री. सुभाषराव काटे (शिवसेना माजी जिल्हाप्रमुख, लातूर), श्री. भारत गव्हानकर, श्री. शिवाजी मुद्देवाड, श्री. शिवाजी गेडेवाड, श्री. राजु गुडमेवाड, श्री. संजय पिल्लेवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.