मुदखेड पंचायत समिती आयएसओ मानांकन
नांदेड,14- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुदखेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील मुदखेड पंचायत समिती तिसरी आहे. यापूर्वी नांदेड व लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे.
मुदखेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, गटशिक्षणाधिकारी आर. एल.आडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, विस्तार अधिकारी एस. यु. भाडेकर, निलेश बंगाळे, दत्तात्रय उपलेंचवार, हंबर्डे, सुरेश पाटील, कृषी विभाग बंदेल, पाटील, गोडसे, अधीक्षक संतोष दासरवाड, व्ही. के. सोनुने, गट समन्वयक लक्ष्मीकांत टाकळकर, मोहित गायकवाड तसेच पंचायत समितील विविध विभागा अंतर्गत अधिकारी, कर्मचारी व मुदखेड तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांना प्रदान करण्यात आले.
मुदखेड पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून पंचायत समितीने मानांकन मिळविले आहे. मुदखेड पंचायत समितीला आयएसओ नामांकन मिळवण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनाचे विशेष योगदान मिळाले आहे.
मुदखेड पंचायत समितीने नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या यशानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणखी नाविन्यपूर्ण कामगिरी करावी. हे मिळालेले मानांकन कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये नाविन्यता, गुणवत्ता व उत्तम कार्यपद्धतींचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या विभागात अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. – मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड