राष्ट्रीय पोषण महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी: नांदेड जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा
नांदेड, 13- राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत नांदेड जिल्हयाने 4 हजार 164 अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल 74 लाख 45 हजार 345 नोंदी घेत राज्यात व्दितीय क्रमांक मिळविला आहे.
राज्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून सप्टेंबर महिन्यात पोषण माह अभियान राबविण्यात आले. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे आज गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात सत्कारासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच महिला व बाल विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांना मुंबई येथे निमंत्रित करण्यात आले होते. आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नांदेड येथील कार्यक्रमामुळे ते मुंबई येथे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु हा सन्मान त्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार यांनी स्वीकारला आहे.
या उपक्रमात अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्यासोबतच गरोदर व स्तनदामातांसाठी मार्गदर्शन, दररोज नवीन रेसीपीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार देणे यासह इतर उपक्रमांचा समावेश होता. दरम्यान, नांदेड जिल्हयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी अंगणवाड्यांमधून विविध उपक्रम राबवले.
पोषण माह अभियान 2023 अंतर्गत आज सह्याद्री आथिती भवन मुंबई येथे महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे, महिला बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कंधारचे बाल विकास प्रकल्प अधिकारी एल. एम. राजुरे, भोकर बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. एस. चटलावार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार यांनी हा पुरस्कार स्विकारला.