मतदान प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल
नांदेड,22- मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो वापरणे ही आपल्या लोकशाही प्रणालीतील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले.
जिल्हयातील नऊ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जनजागृतीसाठी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी मतदान करावे. प्रत्येक मत लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी मोलाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांच्या हस्ते मतदान जनजागृती सेल्फीपॉइंटचे विमोचन करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार, कक्ष अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, अधीक्षक बळीराम एरपुलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, प्रलोभ कुलकर्णी, सुनिल मुत्तेपवार, आशा घुले सारिका आचमारे, अनिल कांबळे, शिवराज पवार, हणमंत राठोड, संभाजी पोकले, मुकुंद अळसपुरे, माणिक भोसले, सुनिल दाचावार यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
30 हजार कर्मचा-यांनी घेतली मतदानाची शपथ
नांदेड जिल्हयातील सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयातून आज मतदान शपथ घेवून मतदाचे महत्व विशद करण्यात आले. जिल्हयातील सुमारे 30 हजार अधिकारी व कर्मचा-यांनी आज मतदानाची शपथ घेतली. मतदान जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचा-यांनी आपआपल्या क्षेत्रात तसेच नाते परिवार तसेच गावस्तराव मतदानाची जनजागृती करण्याचा संकल्प केला.