क्राईम
जि.पो.अधीक्षक धरणेच्या ठोस आश्वासनानंतर कंचर्लावारांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार,पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके सक्तीच्या रजेवर
किनवट.(अकरम चव्हाण): किनवट शहरातील सराफा व्यापारी श्रीकांत भूमन्ना कंचर्लावार यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली जनक्षोभाची परिस्थिती लक्षात घेऊन, किनवटचे पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाऊन, फरार असलेले दोन आरोपी लवकरच जेरबंद होतील. तसेच हे प्रकरण फास्ट न्यायालयात चालवून दोषींना कडक शिक्षा होईल असे प्रयत्प करूत. एक उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचार्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारी लक्षात घेता त्यांचीही चौकशी करण्यात येईल, असे ठोस आश्वासन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक भोकर डॉ.के.एस.धरणे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला व आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकार्यांना दिल्यानंतरच मयत श्रीकांत कंचर्लावार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
किनवट शहरातील सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्यावर व त्याचे लहान बंधू व्यंकटेश कंचर्लावार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात तत्परतेने कार्यवाही करणे अपेक्षित असतांना, पोलीस आरोपींना पाठीशी घालीत असल्याचे त्यांच्या कृत्यातून दिसून येत होते. तसेच त्यांनी आरोपींनी अटक करण्यासाठी लावलेला विलंब पाहता, मयताच्या नातेवाईकांनी ज्या ज्या वेळी पो.स्टे.जाऊन चौकशी केली होती, तेव्हा पोलिसांनी पैशाची मागणी केली होती, असा आरोप शिष्टमंडळाच्या भेटीच्या वेळी वरिष्ठांना सांगण्यात आले. अखेर आज गुरूवारी शिष्टमंडळाची आक्रमकता व समाजबांधवांचा रोष लक्षात घेता पो.अधीक्षक डॉ.धरणे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना ठोस आश्वासन दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन मयताचे पार्थिव पो.स्टे.मध्ये न आणता व आंदोलन न करता शांततेत अंतिम संस्कार पार पाडलेत.
यावेळी किनवट शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी असोशिएशनचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना व ठाकरे गटाची शिवसेना या राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व पत्रकार यांनी संयुक्तरित्या निवेदन देऊन किनवटचे पो.नि.अभिमन्यू सोळंके, पो.उप नि.गणेश पवार, पो.हे.कॉ.गणेश चौधरी, पो.का.कोलबुद्धे या चौघांच्या विरोधात कार्यवाही करून त्यांचे निलंबन करण्यात यावे. तसेच तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या पो.कर्मचार्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात. कारण पो.स्टे.हद्दीत वाढलेली अवैध गुन्हेगारी, बेकायदेशीर धंद्यांतून अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे, हे धंदे प्रतिबंध करण्यासाठी हे पोलीस सोयीस्कररित्या कानाडोळा करीत आहेत, असेही निवेदन यावेळी देण्यात आले. निवेदनाबाबत चर्चा करतांना डॉ.धरणे यांनी सांगितले की, सर्व पो.कर्मचार्यांची चौकशी नि:पक्षपणे केली जाईल. सध्या किनवट पो.स्टे.ची जबाबदारी पो.नि.विकास पाटील यांच्याकडे असून, कंचर्लावार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सर्व चौकशी उपविभागीय पो.अधिकारी विजय डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ते नक्कीच या प्रकरणी सखोल तपास करून उर्वरीत आरोपींना लवकरच जेरबंद करतील. तसेच आज गुरूवारी सकाळी विदर्भातून पोलिसांनी तीन फरार आरोपींपैकी एक संतोष शिवराम कोल्हे याला अटक केली असून, विशाल अशोक कोल्हे व विकास अशोक कोल्हे यांचा शोध घेतला जात आहे.
यावेळी कंधारचे उपविभागीय पो.अधिकारी एम.डी.थोरात, धर्माबादचे उपविभागीय पो.अ.विक्रम गायकवाड, जिल्हा गोपनीय शाखेचे प्रशांत देशपांडे, गुन्हा शाखेचे द्वारकादास चिखलीकर हे वरिष्ठ पो.अधिकारी तसेच भोकर, सिंदखेड, मांडवी, इस्लापूर व हिमायतनगर येथील पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामुळे पो.स्टे.ला छावनीचे रूप प्राप्त झाले होते. पो.स्टेमध्ये गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्यसंघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार, नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विजय कुंचनवार, सचिव प्रवीण काचावार, पवन गादेवार, साईनाथ वट्टमवार, साईनाथ मेडेवार, परेश चिंतावार, मनीष चक्रवार, गिरीश कोत्तावार, महेश पत्तेवार, विलास निलावार, प्रवीण जन्नावार किनवट तालुका आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष दिनकर चाडावार यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.