शिक्षण
जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 4 ऑक्टोबर रोजी
नांदेड दि. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविणाऱ्या शिक्षकास नांदेड जिल्हा परिषदेकडून जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2022, 2023 व 2024 या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या एकूण 100 शिक्षकांना दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी येथील कुसुम सभागृहात सकाळी 10 वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन हे राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार , महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या ठिकाणी महावाचन उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.