औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
नांदेड दि. 31 औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटोदा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील सहाय्यक अधिव्याख्याता, शिल्प निदेशक आणि वरिष्ठ लिपिक यांचे मागील चार महिन्यापासून वेतन प्राप्त झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली आहे. वारंवार मागणी करूनही वरिष्ठ याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत किनवट तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या पाटोदा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणाचे कार्य करणाऱ्या प्रशिक्षक आणि वरिष्ठ लिपिकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.
वरिष्ठांना विनंती करून देखील या कर्मचाऱ्यांचे तीन- तीन, चार-चार महिने वेतन होत नाही. वास्तविक पाहता शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे महिन्याला व्हायला पाहिजे पण वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे येथील वेतनामध्ये नियमित अनियमितता असल्याचे दिसून येत आहे तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन मिळवून द्यावे अशी मागणी येथील कर्मचारी करीत आहेत. अन्यथा त्यांची दिवाळी ही अंधारातच होणार यात शंका नाही.