अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी
नांदेड (दि. 28) दीपोत्सव अर्थात दिवाळी म्हटले की प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आलेले आपण पाहतो. सर्वत्र विद्युत रोषणाई, मंद, उबदार दिव्यांची आरास घरांची शोभा वाढवत असते. तसेच घराघरात आपापल्या ऐपतीप्रमाणे निरनिराळे रुचकर, चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी असते. दीपावली सुट्ट्यांमध्ये ह्या सर्व आनंदोत्सवात कृतियुक्त, सृजनात्मक घरच्या अभ्यासाची गोड भेट देऊन अक्षर परिवार नावाने राज्यभर सुपरिचित असणाऱ्या वाजेगाव बीट ने अक्षर दिवाळी साजरी करत आपले वेगळेपण जपले आहे.
या माध्यमातून बीट मधील तेराही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिवाळी अभ्यासाच्या कृतीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये अभ्यासाला पडणाऱ्या खंडाला आळा बसणार आहे.अनेकदा दिवाळी सण संपल्यावर उर्वरित सुट्ट्यांमध्ये मुलांनी करावे काय असा प्रश्न त्यांना पडतो. त्यावेळी ह्या कृतीपुस्तिकांच्या माध्यमातून अनेक कृतींचा सराव केल्याने विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमतेला वाव मिळणार आहे.शिवाय अभ्यासाची गोडी कायम राहून दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर शाळा प्रारंभानंतर शाळेच्या अभ्यासाचा कंटाळा देखील विद्यार्थ्यांना येणार नाही.
ह्या अनेकविध लाभ असणाऱ्या उपक्रमाची प्रेरणा ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणाधिकारी (मनपा नांदेड) तथा विस्तार अधिकारी वाजेगाव व्यंकटेश चौधरी यांच्याकडून घेत, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फरहत बानो(वाजेगाव), पदोन्नत मुख्याध्यापक पंढरीनाथ टापरे(वांगी), सायलू मंकोड(ब्राम्हणवाडा), रामराव देशमुख(त्रिकुट), माधव कल्हाळे(वडगाव), गणेश कहाळेकर (पिंपळगाव मिश्री), रंगनाथ सोनटक्के (फत्तेपूर), संगमनाथ पांचाळ(इंजेगाव), दत्तप्रसाद पांडागळे (वाडीपुयड), बाबुराव सूर्यवंशी (सिद्धनाथ), गणेश टेकाळे(पुणेगाव), अक्षय ढोके(नागापूर), पुष्पलता मावलीकर (वाडीपुयड नवीन) या मुख्याध्यापकांनी सदरील उपक्रमाची अंमलबजावणी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या शाळेत केली. या सर्व मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.