अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली; भारतावर थरारक विजय, मालिकेतील आव्हान कायम
गुवहाटी: अखरेच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ५ विकेटनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या २२३ धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी (नाबाद १०४) खेळीने पार केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान कायम ठेवले. पाच सामन्यांची मालिका २-१ अशा स्थितीत आहे. दोन्ही संघातील चौथी टी-२० मॅच रायपूर येथे १ डिसेंबर रोजी होणार आहे.
भारताने दिलेल्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धमाकेदार सुरुवात केली होती. पाचव्या षटकात अर्शदीप सिंगने आरोन हार्डीला १६ धावांवर माघारी पाठवले आणि संघाला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर सहाव्या षटकात धोकादायक ट्रॅव्हिस हेडची विकेट घेऊन भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. सातव्या षटकात भारताला रवी बिश्नोईने आणखी एक यश मिळून दिले. त्याने जोश इंग्लिसला १० धावांवर बोल्ड केले. यामुळे आक्रमक सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ६८ अशी झाली.
जोश इंग्लिस बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस वेगाने धावा केल्या. ही जोडी अक्षर पटेलने फोडली. त्याने स्टॉइनिसला १७ धावांवर बाद केले. त्याच्या जागी आलेल्या टिम डेव्हिडला बिश्नोईने शून्यावर बाद केले. त्यानंतर मॅक्सवेल आणि कर्णधार वेड यांनी तुफानी फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताच्या डावाची सुरुवाच आक्रमक झाली होती पण २४ धावांवर टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांची विकेट गमावली होती. त्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागिदारी केली. सूर्या २९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह ३९ धावा करून बाद झाला. एका बाजूलने भारताच्या विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. त्याने गोलंदाजांची बेदम धुलाई केली.
२०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या सोबत असलेल्या तिलक वर्माने २४ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. ऋतुराजने फक्त ५७ चेंडूत २१५.७९च्या स्ट्राइक रेटने १३ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १२३ धावा केल्या. त्याच्या या शतकाच्या मदतीवर भारताने २० षटकात ३ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला.