अकोला पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
अकोला येथे एका गावगुंडाने अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिस आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे गंभीर आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास दुसऱ्या जिल्ह्यातील महिला पोलीस अधीक्षकांकडून करावा, नराधमाला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांविरुध्द कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, अकोला येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना दि. 20 नोव्हेंबर, 2023 रोजी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राज्यातील महिला व मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपी गणेश कुमरे या नराधमाने या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केले, मुलीला सिगारेटचे चटके
दिले, तिचे मुंडन केले आणि लैंगिक अत्याचार केला. अनेक दिवस हा गावगुंड पीडितेला त्रास देत होता. त्यामुळे आरोपी गणेश कुमरे या गावगुंडाविरुध्द पीडितेच्या आईने दोन वेळा अकोल्याच्या खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. पीडितेची आई असत्य बोलणारच नाही.
पण पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. आता हेच पोलिस अशी तक्रार आलीच नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. गावगुंडाला पाठीशी घालणारे पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवायचा कसा, नराधमाला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांमध्ये एवढी हिम्मत आली कोठून, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.
वरकमाईसाठी पोलिसांचेच त्याला संरक्षण होते गणेश कुमरे हा नराधम खदान भागातच गांजा विक्रीचा धंदा करत असल्याची माहितीही पुढे आली आहे. आजपर्यंत पोलिसांना या अवैध धंद्याची माहिती मिळाली नव्हती, की
वरकमाईसाठी पोलिसांचेच त्याला संरक्षण होते, हा देखील चौकशीचा भाग आहे. हा सर्व प्रकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे. या पोलिसांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. यामुळे या प्रकरणाची सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी. पोलिसांनी तक्रार आल्यानंतर लगेच कारवाई केली असती तर आज ही अल्पवयीन मुलगी अत्याचारापासून वाचली असती. पण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी पोलिस प्रशासनाचे वाभाडे काढले.