मनोरंजन

शाहरुख खानचा गौरव; कोणत्याच भारतीयाला मिळाला नाहीये हा मान

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा स्वित्झर्लंड याठिकाणी मोठा सन्मान होणार असल्याचे जाहीर झाले आणि किंगखानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अभिनेत्याचा हा खास सन्मान लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये होणार आहे. ७७व्या Locarno Film Festival मध्ये Shah Rukh Khan ला करिअर अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मंगळवारी २ जुलै रोजी या पुरस्काराची घोषणा झाली. भारतीय सिनेविश्वात उल्लेखनीय काम केल्याने त्याचा हा सन्मान होणार आहे.

विशेष पुरस्कार प्रदान करुन होणार शाहरुख खानचा सन्मान

‘पार्दो अला करिएरा असकोना-लोकार्नो टुरिझम’ या पुरस्काराने सन्मानित होणार शाहरुख पहिला भारतीय आहे. याआधी इटालियन फिल्ममेकर फ्रासेस्को रोसी, अमेरिकन गायक हॅरी बेलाफोनेट आणि मलेशियन दिग्दर्शक साय मिंग-लियांग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दिग्गजांच्या यादीत आता शाहरुखचे नावही जोडण्यात आले आहे.

परदेशात संंबोधित करणार SRK

१० ऑगस्ट रोजी पियाझा ग्रँडे याठिकाणी शाहरुख खानला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी शाहरुखची मुख्य भूमिका असणारा आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास सिनेमाचे खास स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे. २००२ साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला. याशिवाय ११ ऑगस्ट रोजी शाहरुख ‘फोरम स्पेजियो सिनेमा’मध्ये जनतेला संबोधितही करणार आहे. भारतीयांसाठी आणि भारतीय सिनेमासाठी शाहरुखचा हा सन्मान एक मोठा सन्मान आहे.

एका निवेदनात, लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलचे कलात्मक दिग्दर्शक जिओना ए. नाझारो यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘लोकार्नोमध्ये शाहरुख खानसारख्या दिग्गजाचे स्वागत करणे हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे झाले आहे! भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. खान हा एक असा राजा आहे ज्याने त्याला मुकूट प्रदान करणाऱ्या प्रेक्षकांशी कधीही संपर्क तोडला नाही.’ त्यांनी शाहरुखला ‘लोकांचा नायक’, ‘डाउन टू अर्थ’ अशा विशेषणांनी संबोधले.

२०२३ ठरलं खूपच खास

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास गेल्यावर्षी २०२३ मध्ये त्याने बॅक टू बॅक तीन हिट चित्रपट दिले. चार वर्षांचा ब्रेक घेऊन शाहरुखने सिनेविश्वात दणक्यात कमबॅक केले. YRF चा ‘पठाण’, एटली दिग्दर्शित ‘जवान’ आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हे तिन्ही चित्रपट गाजले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button