मनोरंजन

चित्तथरारक,रोमहर्षक शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ


नांदेड  दि. 16 :- राज्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील एक अभिनव सुरुवात नांदेड जिल्ह्यातून आज झाली आहे. राज्याच्या संस्कृतीला उजागर करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा प्रशासनाने शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराची जोड दिली. मैदानाशी संबंध तुटलेली पिढी या चित्तथरारक रोमहर्षक क्रीडा प्रकाराला बघून स्तिमित झाली. आजपासून पुढील पाच दिवस क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना अनुभवायला मिळणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. आज सकाळी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकालीन पारंपारिक खेळाच्या स्पर्धांनी या आयोजनाची सुरुवात झाली. यात खो-खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मल्लखांब, आटयापाटया, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी या खेळाच्या आकर्षक प्रात्यक्षिकांने उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने शाळकरी मुले यावेळी उपस्थित होती.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते एस.एम. पटेल, अभिनेता शुशांत शेलार आणि पारंपारिक खेळाचे जिल्हा प्रतिनिधी, खेळाडू, प्रशिक्षक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. खो -खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मलखांब, आट्यापाट्या, घुंगुर- काठी, लाठी-काठी, रस्सीखेच गतका,लगोरी आदी खेळांच्या संदर्भातील अद्यावत माहिती तसेच या खेळातील निष्णात खेळाडूंची प्रत्यक्ष उपस्थिती, त्यांच्याकडून झालेले सादरीकरण लक्षवेधी होते. या सर्व खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळाचे प्रात्यक्षिकच नव्हे तर यांची स्पर्धा असून उद्या दुपारी तीन वाजता क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे.

आजचे कार्यक्रम
कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे उद्या शुक्रवारी सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत सुप्रसिध्द सिने व नाटय कलावंताचे बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. यात संकल्पना आणि दिग्दर्शन शुशांत शेलार यांचे असून निवेदन संदीप पाठक हे करणार आहेत. तर माधुरी पवार, अभिजीत केळकर यांच्या नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. ज्ञानेश्वर मेश्राम, मनीष राजगिरे, पद्यनाभ गायकवाड यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार असून यात पाटा गायन, लोक वाद्यवृंद, पारंपारिक मंगळागौर, दंडार नृत्य, छ. शिवाजी महाराज पोवाडा, सनई, हलगी वादन, लोकसंगीत, पारंपारिक कोलाम समुह नृत्य, लेहंगी नृत्य, दिवली लोकनृत्य, छ. शिवाजी महाराज दर्शन इ. कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
प्रवेश निःशुल्क, पासेसची गरज नाही
जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका या ठिकाणी आवश्यक नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

१७ ते १९ काळात विविध आयोजन
उद्याच्या सांस्कृतिक सोहळ्याच्या सुरुवातीनंतर 17 फेब्रुवारीला आदिमाया आदिशक्ती तर 18 फेब्रुवारीला सिने नाट्य कलावंतांच्या सहभागातील जल्लोष कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथे होतील. याचवेळी नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरील प्रदर्शनीय दालनांना भेट द्यावी, ही विनंती करण्यात आली आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी विविध वस्तू तसेच बचत गटांचे स्टॉल असतील.खानपाणाची देखील अनेक स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवचरित्रावरील आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन 18 व 19 फेब्रुवारीला आयटीआय कॉलेज, नांदेड येथे दहा ते आठ या कालावधीत होत आहे. सांस्कृतिक मेळाव्याच्या निमित्ताने प्रशासनाने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button