महासंस्कृती महोत्सवात बचतगटांचे विविध स्टाँल
नांदेड,15- नांदेड येथे काल पासून महासंस्कृती महोत्सवाला सुरवात झाली असून आज कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे सुप्रसिध्द सिने व नाटय कलावंताचे बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. दरम्यान या महोत्सवात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, शहरी उपजीविका अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शनी उभारण्यात आली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर, रत्नागिरी, पैठण, जालना, लातूर जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील बचतगटांचे स्टॉल येथे राहणार आहेत. या महोत्सवात बचतगटासह विविध स्टॉल उभारण्यात येत आहेत.
या महोत्सवातील खास वैशिष्ट्य म्हणजे पैठणी साडी, कोल्हापूरी चप्पल, पैठणी टोपी, रत्नागिरीचा हापूस आंब्याचा गर, सिंधुदुर्ग येथील अस्सल काजू, धाराशिवचे कुंथगिरी पेढे, शेगावची चविष्ट कचोरी व कोल्हापूरचा लाल-पांढरा रस्सा आदी चविष्ट खाद्यपदार्थ राहणार आहेत. याचा आस्वाद नांदेडवासियांनी सहकुटूंब घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महापालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. तुबाकले यांनी केले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवा मोंढा येथे कला सादरीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य स्टेजची पाहणी केली.
महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्थामहाराष्ट्राचा लोकोत्सव कार्यक्रमासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले असून येथे महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी विविध पारंपारिक लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.