हॉकी नांदेड संघाला मिनी ओलम्पिक मध्ये कांस्य पदक ! गुरमीतसिंघ नवाब यांचे मार्गदर्शन लाभले
* नांदेड रेलवे स्थानक येथे संघाचा जल्लोषात सत्कार
* एसो टर्पची व्यवस्था व्हावी
रविंद्रसिंघ मोदी
नांदेड दि. 10 जानेवारी : भारत शासन आणि महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग तर्फे पुणे येथे खेलो इंडिया व ओलंपिक पूर्व तयारीच्या दिशेने आयोजित मिनी ओलंपिक स्पर्धेत नांदेड हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. उल्लेखनीय कामगिरी करून नांदेडला परतल्यानंतर मंगळवारी सकाळी हॉकी नांदेड संघाचा रेलवे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांनी संघाचे अभिनन्दन केले. तसेच क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, संचालक जसबीरसिंघ चीमा, स. बलजीतसिंघ गाडीवाले सह खेळाडूंची उपस्थिती होती. दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने रेलवे स्थानकापुढे बैंड वाजवून खेळाडूंच्या आगमनावेळी स्वागत करण्यात आले.
तसेच पुष्पहार घालून व मिष्ठान्नाचा वाटप करण्यात आला. सचिव हरविंदरसिंघ कपूर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भारत शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने क्रीडा धोरणानुसार ओलम्पिक स्पर्धांच्या पूर्वतयारीला प्रोत्साहित करण्यासाठी पुणे येथे राज्यस्तरावर मिनी ओलंपिक स्पर्धेचे आयोजन दि. 01 जानेवारी 2023 ते दि. 11 जानेवारी 2023 दरम्यान करण्यात आले होते. वरील स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून हॉकीच्या आठ संघाना अंतिम स्पर्धेची संधी देण्यात आली होती. त्यात नांदेड संघाचा समावेश होता. हॉकी नांदेड संघाला जिल्हास्तरीय संघ म्हणून पाठवण्यात आला होता. दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष माजी नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी यासंघाला मार्गदर्शन केले होते.
तसेच स्पर्धेच्या तयारीत जितेंदरसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, जसपालसिंघ काहलो, महेन्दरसिंघ लांगरी, जसबीरसिंघ चीमा, महिंदरसिंघ गाडीवाले, विजय नंदे यांनी परिश्रम घेतले होते. हॉकी नांदेड संघाचे कर्णधार सन्नीसिंघ यांनी सर्वांचे आभार मानले. नांदेडच्या हॉकी खेळाच्या प्रगतिसाठी नांदेड मध्ये अद्यावत क्रीडांगण आणि एसो टर्प उपलब्ध व्हावे असे त्यांनी सांगितले. तर हरविंदरसिंघ कपूर यांनी सांगितले की नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आणि गुरुद्वारा बोर्डाच्या समन्वयातून चांगले आधुनिक क्रीडांगण उपलब्ध होऊ शकते. हॉकी खेळाडूंच्या या यशाबद्द्ल अनेकांनी त्यांचे अभिनन्दन केले आहे.