देश विदेश

नागपुरात फटाका बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट, सहा जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नागपूर : नागपूर शहरालगत असलेल्या धामणा येथे गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाचा फटाका कारखाना आहे. जिथे फटाके बनवण्याचे काम केले जाते. रोजच्याप्रमाणे गुरुवारीही सर्व कर्मचारी कामासाठी दाखल झाले होते. कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या सुमारास आग लागली. गनपावडर असल्याने मोठा स्फोट झाला.

स्फोट झाला तेव्हा तेथे १० लोक काम करत होते. हा अपघात इतका भीषण होता की त्यात काम करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. प्रांजली मोद्रे (वय २२), प्राची फाळके (वय २०), वैशाली क्षीरसागर (वय २०), मोनाली अलोने (वय २७) आणि पन्नालाल बंडेवार (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये शीतल चपट (वय ३०), दानसा मरसकोल्हे (वय २६), श्रद्धा पाटील (वय २२) आणि प्रमोद चावरे (वय २५) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तात्काळ बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याची भिंतही तुटली आणि छतही उडून गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच मृत व जखमींचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक फरार झाले आहे.

फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच काटोलचे आमदार अनिल देशमुख आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्याला गती देण्याचे आदेश दिले. यासोबतच आणखी रुग्णवाहिका तयार करून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

या दुर्घटनेची माहिती देताना नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल म्हणाले, “धामना येथील स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मदतकार्य चालू आहे.”

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button