ठराव केला अन् अंगलट आला! मुस्लिम मतदारांच्या नावांबद्दल वादग्रस्त निर्णय,
ठरावानंतर वाद निर्माण झाल्यानंतर अखेर ग्रामपंचायतीने जाहीर पत्रक काढून ठराव पत्रकात उल्लेख केलेल्या मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाची आम्ही माफी मागतो असं म्हटलंय.
कोल्हापूर : कोल्हापुरात शिंगणापूर ग्रामपंचायतीने मुस्लिम मतदारांसदर्भात ग्रामसभेत वादग्रस्त ठराव मंजूर केला आहे. या ठरावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडालीय. शिंगणापूर ग्रामपंचायतीत मुस्लिम मतदारांची नवी नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, हे पत्र दिशाभूल करणारं असल्याचं आणि ग्रामसभेत ते पत्र अधिकृत नसल्याचंही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
बांगलादेशी अल्पसंख्यांकाबद्दल हा ठराव करण्यात आल्याची माहिती शिंगणापूरच्या सरपंचांनी दिलीय. पण हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर देण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी आणि करवीरच्या तहसिलदारांना आदेश देण्यात आले असून यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं.
शिंगणापूर गावच्या हद्दीत नवी मतदार नोंदणी करताना नव्या अल्पसंख्यांकांची ( मुस्लिम) नावे समाविष्ट करू नयेत असं ठरावानुसार ठरलं होतं. जेव्हा नवी मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा अल्पसंख्यांक (मुस्लिम) नावे नोंद झाल्याचं आढळून आल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकत घेऊन ती नावं कमी करावीत असं या ठरावात म्हटलं होतं.
ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा घेण्यात आल्याची तारीख २८ ऑगस्ट २०२४ अशी आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून खुलासा करण्यात आला आहे. ठराव पत्रकात उल्लेख केलेल्या मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाची आम्ही माफी मागतो. विषमता निर्माण करणारा किंवा तसा हेतू असणारा ठराव केला जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं यामध्ये म्हटलं आहे.