३० जूनपर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा, उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून सरकारला ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ८ जूनपासून मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. पण कालपासून मनोज जरांगेंची तब्येत ढासळली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा धावाधाव सुरु आहे. अखेर भाजप आमदार गिरीश महाजनांनंतर आता सकंटमोचक बनून सरकारच्यावतीने शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले होते. भुमरे आणि देसाईंची जोडी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहचली आणि त्यांचा मनधरणीला यश आले आहे. सरकारच्यावतीने गेलेल्या देसाईंनी जरांगेंसोबत संवाद साधला आणि अखेर जरांगेंनी फक्त देसाई आलेत म्हणूण उपोषण मागे घेत आहे असे म्हणत उपोषण सोडले आहे.
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून द्या अशी चर्चा झाली. सगेसोयरेची मागणी पुर्ण करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ द्या अशी विनंती देसाई यांनी जरांगेंना केली आहे. तसेच उद्या लगेच तातडीने सीएम शिंदेंकडे बैठक लावतो अशी ग्वाही देसाईंनी दिली आहे. मराठा समाजासाठी भरपूर केलंय आता थोडे राहिले ते लगेच पूर्ण करण्याचे आश्वासन देसाईंनी दिले आहे. तुम्ही इथे यायालाच नको होते असे थेट जरांगेंनी भुमरे आणि देसाईंना सुनावले आहे.
सरकारच्या शिष्ट मंडळांनी मनोज जरांगे यांच्याकडे ३० जूनपर्यंत वेळ मागितले यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले “ते मी देतो पण ३० जूननंतर सरकारचे काही ऐकणार नाही तसेच जर सरकारने माझ्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर राजकरणात उतरणार, विधानसभा लढवणार” असा थेट दम मनोज जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर विधानसभेत नाव घेवून उमेदवार पाडू असे थेट जरांगेंनी इशारा दिला आहे. मला राजकरणात येण्याची इच्छा नाही पण मागण्या पुर्ण नाही झाल्या तर मी राजकरणात उतरणार असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
आंदोलन सुरु झाल्यापासून परभणीचे खासदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुरानी, बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मनोज जरांगेंच्या आंदोलनकडे लक्ष वेधण्याची विनंती केली होती.