जिला
अर्धापूर शहरात गुंठेवारीच्या कृत्रिम अडचणीत वाढ; महिनोमहिने टोलवाटोलवी…!
अर्धापूर ( शेख जुबेर ) नगरपंचायत मध्ये मुद्दामहुन गुंठेवारीसाठी अडचण आणली जात आहे. ‘चिरीमिरी’ दिली की ही अडचण मात्र दूर होते. सर्वसामान्य जनतेच्या कामात अडचणी निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रकार नगरपंचायतमध्ये होत आहे. गुंठेवारी व ले आउट मंजुरी केलेल्या कामांचे लेखापरीक्षण समिती गठीत करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद युनूस पार्डीकर यांनी निवेदनद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अर्धापूर नगरपंचायत मधील नगर रचना सहाय्यक अभियंता हे नागरिकांनी सादर केलेल्या गुंठेवारी व रेखाकन ले आऊट प्रस्तावात अडचणी निर्माण करून काम करण्यास मुद्दाम वेळ लावतात, आणि नागरिकांना पैसे देण्यास भाग पाडतात. अडचणीत सापडलेल्या लोकांना नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. सामान्य नागरिकाना गुंठेवारी प्रमाण पत्र घेण्यासाठी इच्छा नसतानाही पैसे द्यावे लागतात. ज्यांनी पैसे दिले त्यांचे काम अर्जंट केले जाते. ज्यांनी पैसे दिले नाही अशा कामांना मात्र वेळ लागतो. अर्धापूर नगरपंचायत मध्ये सामान्य नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्र प्रचंड वेळ लागतो. पैसे घेवून अनेक नियम बाह्य कामे केल्याची शंका आहे. म्हणून केलेल्या कामांची व गुंठेवारीची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद युनूस पार्डीकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नगर रचना सहसंचालकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी करतात गोड बोलून बोळवण
अनेक महिने काम रखडल्यानंतर एखादा नागरीक मुख्याधिकारी यांच्याकडे गेला, तर केवळ मी बोलतो- मी सांगतो. फक्त गोड बोलून त्या तक्रारदाराची बोळवण करतात. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये खर्चून घेतलेली मालमत्ता घेऊन गुन्हा केला काय? आमची अडचण कुणी समजून घेणार आहे की नाही. अशी आर्त हाक येथील सर्वसामान्य नागरिक देत आहेत.