हिमायतनगर येथे सीईओंच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
नांदेड,5-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी उपस्थित नागरिंकांच्या समस्यांवर चर्चा करुन निवारण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुखांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवादाची भावना निर्माण झाली आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास मदत झाली आहे. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्हा स्तरावर संबंधीत विभाग प्रमुखांना वर्ग करण्यात आले असून त्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे.
तक्रारींचा आढावा घेण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी एस.एम. मांजरमकर आदींची उपस्थिती होती