ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित, शाश्वत व गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा उपाययोजनांची अंमलबजावणी करावी – संदीप माळोदे
नांदेड,1- ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित, शाश्वत व गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करतांना शासन निर्णयात दिलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य संदीप माळोदे यांनी केले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षण संदर्भात गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य पर्यवेक्षक यांचेसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायतच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी आदींची उपस्थित होती.
पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा करताना काळजी घेतली पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावर मुबलक प्रमाणात टीसीएल उपलब्ध ठेवावे. त्याचा नियमित वापर करावा. दूषित पाण्याचे जर स्त्रोत असतील तर ते स्त्रोत कायमस्वरूपी बंद करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आरोग्य व पाणी गुणवत्ता विषयावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक कपेंद्र देसाई यांनी जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षण मार्गदर्शक सूचना, प्रयोगशाळा संरचना, स्वच्छता सर्वेक्षण, एफटीके तपासणी आदी विषयासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी पाणी तपासणी किटव्दारे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. त्यानंतर प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी पाणी गुणवत्ता आणि पाणी तपासणी संदर्भात आढावा घेतला.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, उप अभियंता, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक यांचेसह जिल्हा कक्षातील सहाय्यक प्रशासन अधिकारी अल्केश शिरशेटवाड, डी.डी. पवार, विशाल कदम, चैतन्य तांदुळवाडीकर, डॉ.नंदलाल लोकडे, निकीशा इंगोले, कृष्णा गोपीवार, सुशील मानवतकर, विठ्ठल चिगळे, सूर्यकांत हिंगमीरे, प्रतिभा बिरादार, सारीका कदम आदींची उपस्थिती होती.