ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी
नांदेड, दि. 4 ः राज्यात सर्व जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदांचे गठन झाले असून सार्वजनिक ग्राहक हिताचे निर्णय जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत. पण मागील सहा,सात वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात मात्र ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसते असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य सहसंघटक सौ. मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले. २४, २५ आॅगस्ट रोजी कोल्हापूर येथे संघटनेच्या नियोजित वार्षिक राज्य अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्हा आढावा बैठकीत सौ. कुळकर्णी बोलत होत्या.
यावेळी नांदेड जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्यअध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी केली. स्वामी विवेकानांदांच्या “शिवभावे जीवसेवा” या सूत्रावर आधारित ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीनूसार नांदेड जिल्ह्यात ग्राहक संघटन व प्रबोधनाचे कार्य अग्रेसर असल्यामुळे डाॅ. लाड यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाअध्यक्ष प्रा.डाॅ. दीपक कासराळीकरांनी ग्राहक पंचायतीचे कार्य पसायदानावर आधारित असल्याचे सांगितले. जिल्हा संघटक प्रा. आनंद कृष्णापूरकर यांनी जिल्ह्यातील कार्याचा अहवाल प्रास्ताविकात सादर केला. जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. सायन्ना मठमवार यांनी सूत्रसंचलन केले.
अरूण बिडवई, रंगनाथ उंबरकर, प्रा.गोपाल बिलोलीकर, अशोक बच्चेवार, मेहताब शेख, गुणवंत वीरकर यांनी तालुका कार्याचा अहवाल सादर केला.
सौ. भागिरथी बच्चेवार यांनी ग्राहक गीत गायले तर अॅड. सौ. दिपाली डोणगावकर यांनी आभार मानले.
बैठकीच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कोल्हापूर येथील नियोजित राज्यअधिवेशनास जिल्हातील सर्व तालुक्यांमधून कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास सहसंघटक प्रशांत वैद्य यांनी दिला. या बैठकीस गंगाधर साधू, ख्वाजा करीमसाब, सोमवाड, अॅड. सौ. शेवडीकर, रंगनाथ उंबरकर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पसायदानाने बैठकीचा समारोप झाला.