माजी खासदार सूर्यकांता पाटील यांची घरवापसी
नांदेड- हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या व केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवलेल्या उत्कृष्ट वक्त्या व धडाडीच्या नेत्या सूर्यकांता ताई पाटील यांनी जवळपास दहा वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून घर वापसी केली आहे रागाच्या भरात पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि दहा वर्षाचा कारावास मी स्वतःच घेतला. तो कारावास आता स्वतःच संपविला आहे. १९९९ प्रमाणेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीला उभे करण्यासाठी सज्ज झाले आहे. पाक्ष सांगेल ती दिशा, सांगेल ते काम करत तोळा तोळा झिजणाऱ्या शरद पवारांना साथ देण्यासाठी आपण सज्ज आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचा शनिवारी राजीनामा दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा प्रवेश सोहळा आज २५ जून रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी सूर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याची मी घोडचूक केली होती है मान्य केले. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्याला तिथे जाऊन तू काय करणार? असा प्रश्नही विचारला होता, असे सांगितले. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या सूर्यकांता पाटलाना तिथे स्थान मिळणार नाही हे त्यांनी तेव्हाच स्पष्ट केले होते. भाजपात जाऊन आपण दहा वर्षे काहीच केले नाही. घराच्या बाहेरही पडले नाही. कुणाला मत द्या म्हणून विनंतीही केली नाही.
भाजपातील दहा वर्षे हा आपला कारावास होता, दहा वर्षाची सजा होती असे त्यांनी स्पष्ट केले. परतीचे सर्व दौर कापत हा कारावास आपण आता स्वतःच संपविला आहे. खूप मोठा विजनवासाचा मध्यंतरी घेतल्यानंतर स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जाताना शरद पवारांची भीती वाटली नाही का असे अनेकांनी विचारले. मात्र बापाची भीती कुठं मुलीला वाटत असते, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीच्या विचारांशी आपली नाळ सदैव जुळलेली होती, असे स्पष्ट केले. विचारांशी सोयरीक झाली तेव्हा त्यामध्ये नफा तोटा शोधायचा नसतो. पक्ष, आपल्याला काय देईल, काय नाही याची आता चिंता नाही. पक्षाने जेव्हा द्यायचे तेव्हा हक्काने सर्व काही दिले आहे. यापुढे आता शरद पवारांनी सुरू केलेले युद्ध जिंकण्यासाठी काम करायचे आहे. साहेब है युद्ध जिंकतील यात शंकाच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीत परतण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, परंतु त्यांना साहेबांची आदरयुक्त भीती वाटत आहे. ही भीती नाहीशी करण्यासाठी आपण स्वतः पुढे जाऊन इतर सर्वांना पक्षात परत आणू असेही त्या म्हणाल्या. ज्या घरातून लेकर पळून जातात त्या घरातील बापाला काम कराव लागत. या वयातही शरद पवार ज्या तडफेने काम करतात ते पाहून आम्हाला आम्हा सर्वांना आता त्याची जबाबदारी घ्यायची उचलायची आहे. शरद पवार यांचे तीळा तोळा झिजणं कमी झालं पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यापुढे पक्ष सांगेल तीच दिशा, पक्ष सांगेल तेच काम आपण करू, १९९९ ची राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभारण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. भाजपातील दहा वर्षाचा कार्यकाळ लक्षात घेता आता स्वगृही परतल्यानंतर पुन्हा फिरुनी नवी जन्मेन मी असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षाचे नेते शरद पवार यांनीही केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचे राजकारण है विचारावर आधारित असल्याचे सांगितले. समाजकारण राजकारण आणि सहकार क्षेत्र यातच त्यांचे आयुष्य गेले आहे. मधल्या काळात मतभेद झाल्यामुळे त्यांनी वेगळी वाट स्वीकारली होती. मात्र या काळातही आपला त्यांच्याशी संवाद सुरूच होता. त्यामुळे विचारांशी कधीही आपल्यापासून त्या दूर झाल्या नाही, त्या कुठेही गेल्या असल्या तरीही त्याचे मन मात्र पक्षातच होते असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात आज जे सामाजिक चित्र निर्माण झाले आहे ते अस्वस्थता निर्माण करणारे आहे. समाजात सार्वजनिक ऐक्य निर्माण करता येईल. यासाठी सूर्यकांता पाटील यांनी काम केले आहे. सामाजिक ऐक्यावर भर देण्याची त्याची भूमिका आहे. आजघडीला महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात सामाजिक ऐक्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले सूर्यकांता पाटील यांनी योग्यवेळी सामाजिक हिताचा राजकीय निर्णय घेतला असल्याचेही शरद पवार यांनी याप्रसंगी सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सूर्यकांता पाटील या स्वगृही परतत आहेत याचा मोठा आनंद होत असल्याचे सांगितले.
त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल. अजूनही अनेक कार्यकर्ते भेटत आहेत. विशेषतः तरुण पिढी शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शरद पवारांचे नेतृत्व सक्षम असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून आगामी काळात अनेक प्रवेश होतील असेही त्यांनी सांगितले. सूर्यकांता ताई पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेशाने निश्चितच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि त्यांच्या संपर्काचा आणि नेतृत्वाचा फायदा राष्ट्रवादी पार्टीला होईल यात शंका नाही त्यांच्या कार्यामध्ये असलेली हातोटी आणि कार्य करण्याची पद्धती यामुळे त्यांनी अजूनही आपले कार्यकर्ते जोडून ठेवलेले दिसून येतात त्याच आधारे निश्चितच येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य उज्वल असल्याचे दिसत आहे