स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ; जिल्हयातील प्रत्येक गावात मोहिम राबविण्यात येणार अभियान कालावधी 1 जुलै ते 31 ऑगस्ट
नांदेड,3, जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून नांदेड जिल्हयातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त आज बुधवार दिनांक 3 जूलै रोजी या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गंगथडे, शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, कृषी अधिकारी व्हि.आर. बेतीवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. दिनांक 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान हे अभियान जिल्हयात राबविण्यात येणार आहे. स्टॉप डायरिया या मोहिमेत गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी शुध्द करण्याचे प्रात्यक्षिक, हात धुण्याचे महत्व तसेच शुध्द पाण्याचे महत्व ग्रामस्थांना सांगण्यात येणार आहे.
डायरिया की रोकथाम, सफाई और ओआरएस से रखे आपणा ध्यान हे या अभियानाचे ब्रिद असून हे अभियान चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दिनांक 14 जून ते 30 जून पूर्व तयारी, दिनांक 1 जुलै ते 14 जुलै या दुस-या टप्प्यात तालुका व गावस्तरावर जनजागृती कार्यक्रम तसेच ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पिण्याचे पाणी तपासणे, तिसरा टप्पा 15 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान राहणार आहे. यामध्ये गाव पातळीवरील पाण्याचे स्त्रोत, स्वच्छतेच्या सुविधा याबाबत व्यवस्थपन, पाणी व आरोग्याचे महत्व नागरिकांना सांगणे, गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करणे, प्रत्येक घरात कार्यात्मक नळजोडणी देणे तर दिनांक 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये पाणी स्त्रोताची स्वच्छता टिकविण्यासाठी व स्वच्छतेच्या सवयी विषयी मार्गदर्शन, पाऊस पाणी संकलन, गावातील हापंप दुरुस्ती, ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या सदस्यांचा सहभाग घेवून गावत जनजागृती रॅली काढणे तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तरी या अभियानात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनणवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकरी नारायण मिसाळ यांनी केले आहे. जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यस्थापक मिलिंद व्यवहारे, पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई, माहिती शिक्षण संवाद सल्लागार नंदलाल लोकडे, समाजशास्त्रज्ञ महेद्र वाठोरे यांनी पुढाकार घेतला.