राजस्थान राज्यातील चिमुकली सोलापूरच्या जत्रेत लेक हरवली, २० दिवसांपासून शोध
सोलापूर : डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या गड्डा यात्रेत नंदी नावाची राजस्थान राज्यातील चिमुकली हरवली आहे. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या राजस्थानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान मुलांची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असताना डोळ्यांसमोरून सात वर्षांची मुलगी गेली अन् परत आलीच नाही. होम मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत फिरत आहे. “मेरी नंदी को किसींने देखा?” आई वडिलांची शोधाशोध पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे. गड्डा यात्रा जवळजवळ संपत आली, अनेक व्यापारी जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, नंदीमुळे जवळपास शंभर एक राजस्थानी लोक (जत्रेतील छोटे व्यापारी) सोलापुरात थांबून आहेत.
आई वडिलांचा टाहो पाहून अनेकांचे डोळे पाणावले
”आईस्क्रीम लेने गई, बच्ची वापस नही आयी साब”, म्हणत आई वडील टाहो फोडत आहे. कैलास भोरीया बावरीया (वय ५०), रामनरी कैलास बावरीया (४५ दोघे रा. सेवा, ता. बजीलपूर, जि. गंगापूर, राज्यस्थान) हे पती-पत्नी गड्डा यात्रेनिमित्त १३ जानेवारी रोजी मुलांसमवेत सोलापुरात आले होते. २० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी व्यवसाय करत होते. दरम्यान, नंदी ही सात वर्षांची मुलगी होम कुंडाजवळ खेळत होती. ती चालत गड्डा यात्रेतील स्टॉलच्या दिशेने निघाली.
रस्त्यात वडील कैलास बावरीया होते, त्यांनी तिला हटकले. ”बेटा तु कुठे चाललीस?” असे विचारले तेव्हा तिने आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. वडील पुन्हा व्यवसायाच्या नादी लागले. थोडावेळ झाल्यानंतर त्यांना मुलीची आठवण आली. ते पुढे काही अंतरावर असलेल्या पत्नीच्या स्टॉलवर गेले. पत्नी रामनरी यांना विचारणा केली. तिने माहिती नसल्याचे सांगितले. रात्रभर मुलीचा शोध घेतला, पण ती कोठेही दिसून आली नाही. २० जानेवारी पासून राजस्थानी कुटुंब यात्रेत आणि सोलापूर शहरातील विविध ठिकाणी वणवण भटकंती करत आहे. आई वडिलांचा आक्रोश पाहून सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल
अवघ्या सात वर्षांची मुलगी, कुठे गेली असेल? काय करत असेल? या विचाराने आईचे अश्रू थांबत नाहीत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ती फोटो दाखवून ”मुलीला कुठे पाहिले आहे का?” असं विचारत आहे. ”मी पाया पडते, माझी मुलगी मला आणून द्या”, असं म्हणत आई लोकांना ओरडत आहे. या प्रकरणी सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर मुलीचे नाव – नंदनी कैलास बावरीया वय (वर्ष ७, रंग गोरा, उंची २ फुट ६ इंच) बोलीभाषा हिंदी आहे. नंदी ज्यावेळी बेपत्ता झाली त्यावेळी अंगावर निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. सदर मुलगी मिळून आल्यास किंवा कुठेही दिसल्यास सदर बजार पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.