संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील वकील पुढे सरसावला, म्हणाला…
पुणे: हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी संसदेबाहेर त्यांच्या दोन साथीदारांनी स्मोक बॉम्ब फोडून घोषणाबाजी केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अमोल धनराज शिंदे या तरुणाचा समावेश होता. अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलीस भरतीसाठी जातो सांगून अमोल शिंदे घराबाहेर पडला होता. बेरोजगारीमुळे अमोल व त्याच्या साथीदारांनी लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याची योजना आखली व तडीस नेली, असे सांगितले जाते. या सगळ्या घटनाक्रमानंतर पोलिसांनी अमोल शिंदेला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता वकील असीम सरोदे यांनी अमोलला कायदेशीर मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आपण अमोल शिंदेला करत असलेल्या कायदेशीर मदतीमागील भूमिका असीम सरोदे यांनी स्पष्ट केली आहे. अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला होता. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, असे असीम सरोदे यांनी म्हटले.
अमोल शिंदे याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते. त्यामुळे मला यांनी लिहिलेले खालील विचार पटले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?, असे असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.