२०२४ च्या रेल्वे बजेट पूर्वी काही सूचना व अपेक्षा !!
हर्षद भाई शाह
नुकतीच मुंबई-नांदेड साठी “वंदे भारत” ची घोषणा झाली असली तरी आज पूर्णा स्थानकावर विद्युतीकरणचे काम व गती पाहता जालना च्या पुढे नांदेड पर्यंत ही ट्रेन निदान मार्च पर्यंत तरी वाढण्याचे चिन्ह दिसत नाहीत. नवीन ट्रेन्स व S.C.. Railway तून Central Railway त नांदेड डिवीज़न ला जोडण्याची मागणी करण्यापेक्षा त्वरित विद्युतीकरण अन् दुहेरीकरण पूर्ण करण्यावर ज्यास्त भर दिला तर आपोआप काही नवीन ट्रेन्स व गतिवाढ अन् वेळेत बचत ही अनायसेच होईल.
ह्या अनुषंगाने रेल्वे बजेट येण्या पूर्वी मी नुकतेच पाठवलेल्या माझ्या सूचनावजा निवेदनात खालील गोष्टींचा समावेश केला आहे.
१) देशाच्या समतोल विकासासाठी रेल्वेलाइन ही लाइफ लाइन समजली जाते. प्रवासी सुविधा, माल वाहतूक व कनेक्टिव्हिटी साठी जसे राज्याच्या राजधानीव प्रमुख शहर जोडणं, महत्वाची औद्योगिक, धार्मिक व पर्यटन स्थळ जोडणं, लोकसंख्या व ROR च्या निकषावर नवीन लाईन्स टाकण ह्यावर धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्याच धरतीवर जर देशातील प्रत्येक जिल्ह्याचे रेल्वे लाइन पासून कमाल अंतर ५० किमी तर प्रत्येक तालुक्याचे कमाल अंतर १०० किमी पेक्षा ज्यास्त नसावे जेणे करुन अवघ्या तास दोन तासात मुख्य प्रवाहाशी जोडता येणं प्रत्येक क्षेत्रातील नागरिकाला शक्य होईल. ह्या संबंधी धोरणात्मक निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील बिड, उस्मानाबाद, बुलढाणा सह अनेक जिल्हे रेल्वे नेटवर्कच्या नकाश्यावर येऊन समतोल व भौगोलिक विकास साधता येईल. “जिल्हा जोडो” कार्यक्रम हा भारत जोडो च्या राजकीय कार्यक्रमापेक्षा नक्कीच ज्यास्त फायद्याचा राहील.
२) नांदेड हून पुणे साठी दिवसा पुण्यात ट्रेन साठी प्लास्टफॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून मागणी नाकारली जाते पण पुण्याचे शिक्षणिक व वैदकीय सेवेचे महत्व पाहता तपोवन सारखी दिवसा नांदेड पुणे/ पनवेल ट्रेन जर उपलब्ध झाली तर पुणे साठी फार मोठी सॉइ होईल.
३). औरंगाबाद साथी मराठवाडा एक्सप्रेस सारखी दिवसा ५ वाजता हैदराबाद साठी चेर कार जर उपलब्ध झाली तर दिवस भर काम आटोपून रात्री परत हैदराबाद हून नांदेड येणं अत्यंत सोयीचे होईल. तेव्हा विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर औरंगाबाद जालना परभणीपूर्णा नांदेड धर्माबाद निजामाबाद हैदराबाद नवीन वंदे भारत दिली गेल्यास तिन्ही प्रमुख शहर जोडल्या जातील.
४) नांदेड हून नॉर्थ तसेच पूर्व पश्चिम भारताला जोडण सोयीस्कर व्हावे मानून नांदेड पूर्णा हिंगोली वाशीम अकोला खंडवा व परत अशी जलद वंदे भारत सोडण्यात आली तर दिल्ली, अमृतसर, बरोडा, अमदाबाद, जयपूर, माउंटआबू एमपी बिहार बंगाल बाजूच्या गळ्यातून पुढील प्रवास सोईस्कर होईल.
५) नांदेड बसमत हा ३५ किमी चा मार्ग बायपास केल्यास नॉर्थ व पश्चिम बाजूच्या ट्रेन्स साठी वाया पूर्णा वना जाणारा तब्बल दीडतासाचा वेळ वाचेल.
६) गेली २५-३० वर्ष झाली नांदेड ते मुंबई प्रवास मनमाड ला बदली केल्या नंतर ही १३ तासात होत होता तो आज ही १२ तास घेतो. तेव्हा दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर ह्यावेळात कमी होऊन निदान ८ तासात ६०० किमी अंतर पूर्ण व्हावे ही अपेक्षा रास्त आहे. वेळेपत्रकात तसे बदल व वेळेची बचत अपेक्षीत आहे.
७) रेल्वे कडे असलेल्या फाजील जमिनीचा जसा वाणिज्य वापर करुन उत्पन्न वाढविण्यासाठी स्थानकाचे नूतनीकरण केले जात आहे तसंच निधी औद्योगिक वापरासाठी करण्यात येऊन जर रेल्वे ने जर कारखाने उभारले तर पूर्णा सारख्या शहराचा कायापालट होऊन रोजगार ही वाढेल अन् आइडल रिसोर्सेसचा उपयोग देखिल होईल.
८) जनता आणि रेल्वे प्रशासनह्यात संवाद व्हावा महणून गठीत होणाऱ्या DRUCC ZRUCC सारख्या समिती ह्या राजकीय नेमणुकी पुरत्या अस्तित्वात असून ज्यास्त फायदा होतांना दिसत नाहीं. त्या ऐवजी मा. खाजदार, आमदार, महापौरवा अध्यक्ष, इतर लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, उद्योजकव व्यापारी संघटना व DRM DCM DOM तसेच इतर प्रशासकीय अधिकारी ह्यांची संयुक्त बैठक निदान वर्षातून ४ वेळेस घेण्यात आली अन् पुढील बैठकीत आढावा घेण्यात आला तर अनेक प्रश्न सहज मार्गी लागतील. शासन प्रशासन अन् उपभोक्ता ह्यांच्यात संवाद होणं नितांत गरजेचे आहे.
वरील ८ प्रस्तावाशिवाय प्रस्तावित नांदेड-देगलूर-बीदर तसेच नांदेड-येवतमाळ-वर्धा, जालना-चाळीसगाव परळी-नगर सारखे नवीन जोड मार्ग ही लवकर झाले तर एकंदर रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढून प्रवासी तसेच माल वाहतूक दोन्ही अधिक सोईस्कर होतील.
बघु ह्यातील किती मागण्या पूर्ण होतात अन् येणाऱ्या बजेट मध्ये मराठवाड्याच्या पदरी काय काय पडते. कारण उम्मीद पर ये दुनिया कायम हैं और जब परिवर्तन शुरु हो ही चुका है तो अंजाम भी अच्छे ही होंगे.