बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा: अशोक चव्हाण
नांदेड, दि. १० नोव्हेंबर, २०२३: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक काल मंजूर केले. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल. बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली असून, हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.