क्राईम

परमेश्र्वर जाधव नामक हिमायतनगर (वाढोणा) येथील युवा शेतकऱ्याची शेती प्लॉटिंगच्या वादातून विष प्राशन करून आत्महत्या

 

नांदेड/हिमायतनगर। शहरातील परमेश्वर गल्लीत राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शेतीच्या वादातून विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मयत शेतकऱ्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर जाधव असे मयत शेतकऱ्यांच नाव आहे. विक्री केलेल्या पेक्षा जास्तीची जमीन परस्पर नावावर करून घेणाऱ्या संबंधित 2 व्यक्तीवर 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच या प्रकरणावरून हिमायतनगर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या प्लॉटिंग व शेती विक्रीच्या धंद्यावर प्रश्नःचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत युवा शेतकऱ्याची पत्नी श्रीमती जोत्सना भ्र. परमेश्वर जाधव वय 33 वर्ष व्यवसाय -शेती, घरकाम रा. परमेश्वरगल्ली हिमायतनगर जि.नांदेड यांनी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे हजर होऊन तक्रार दिली की, माझे पती परमेश्वर जाधव यांच्या नावावर खड़की पांदण रस्त्या जवळील हिमायतनगर शिवारातील शेत गट नं. 417 मध्ये 09 गुंठे जमीन होती. तसेच माझे पती रोजमजुरीचे काम करीत होते. दि. 17/02/2023 रोजी माझे पती परमेश्वर जाधव यांनी आम्हाला पैशाची अडचण असल्याने शेत गट नं. 417 मध्ये 09 गुंठे जमीनी पैकी 01 गुंठा जमीन हिमायतनगर शहरातील राहणारे 1. शेख इमरान शेख अनवर 2. मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांना 3,55,000/- (तीन लाख पंचावन हजार रुपये) रुपयास विक्री केला होता. त्यावेळी वरील दोघांनी फक्त 50,000/- रुपये दिले आणि बाकीची रजीस्ट्री झाल्याने देतो असे म्हणाल्या वरुन माझ्या पतीने खरेदी विक्रीच्या कागदपत्रावर सह्या केल्या होत्या.

तसेच माझ्या पतीस लिहीता वाचता येत नव्हते. नंतर आम्हाला 20 दिवसांनी समजले की, 1. शेख इमरान शेख अनवर 2. मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांनी माझ्या पतीच्या आडाणी पणाचा फायदा घेवुन माझ्या पतीच्या नावे असलेली शेत गट नं.417 मध्ये 09 गुंठे जमीन पैकी 07 गुंठे कशी काय नावावर करुन घेतली अशी विचारणा केली असता त्यांनी आमच्या सोबत वाद केला व जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच विकलेल्या 01 गुंठ्या जमिनीचे पैसे सुध्दा दिले नाही. तेंव्हा पासुन वरील दोघे हे माझ्या पतीस त्रास देत होते. आणि भेटेल तेथे वाद घालून 07 गुंठे जागा आमच्या ताब्यात दे नाहीतर तुला जिवानीशी खतम करते अशी धमकी द्यायचे असे मयत शेतकऱ्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगीतले.

एव्हढेच नाहीतर दि. 09/06/2023 रोजी सकाळी 09:00 वा. चे सुमारास दोघांनी आमचे शेत गट नं.417 मधील जमीनीवर येवुन माझ्या पती व दिर विशाल यांना आईवर अश्लील शिवीगाळ करुन तु जर आमच्या जागेवर आलास तर तुला जिवानीशी खतम करतो. असे म्हणुन धमकी दिली व आमचे जागेवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्रासाला व धमक्याला कंटाळुन माझे पती परमेश्वर जाधव यांनी शेतीसाठी आणलेले फवारणीचे विषारी औषध पिऊन उपचारा दरम्यान मरण पावले आहे. माझे पती परमेश्वर जाधव यांचे मरणास 1. शेख इमरान शेख अनवर 2. मिर्झा जुनेद बेग अमीर बेग रा. हिमायतनगर कारणीभुत आहेत व या दोघापासून माझ्या परीवाराच्या जिवीतास धोका आहे.

असा जबाब पोलिसांनी टंकलिखीत केला असून, याबाबत हिमायतनगर पोलिसांनी वरील दोघा विरुद्ध सी आर 125, कलम 306, 504, 506, 534 प्रमाणे फिर्यादी ज्योत्स्ना परमेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button