क्राईम

मित्राला शेवटची दारु पाजून गेम, डिझेल टाकून जाळलं, हातावर एक शब्द आढळला अन् आठ दिवसात खेळ संपला

नांदेड : जिल्ह्यात एका मिसिंग प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका मित्राने आपल्याच मित्राला बीड जिल्ह्यातील परळी येथे नेऊन त्याचा निर्घृण पणे खून केला. एवढंच नाही पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी प्रेत देखील जाळले. मात्र, हातावरील टॅटूमुळे मयताची ओळख पटली आणि आरोपींच कटकारस्थान उघड झालं. सचिन परमेश्वर शिंदे असं या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी बुधवारी आरोपी दिलीप हरिसिंग पवार याला ताब्यात घेऊन परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. शुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२४ वर्षीय मृत सचिन शिंदे हा शहरातील एमजीएम महाविद्यालय परिसरातील विस्तारित नाथनगर येथील रहिवासी आहे. २९ मे रोजी पैसे वसुली साठी परभणीला जातं आहे, असं सांगून तो घरा बाहेर पडला होता. मात्र तेव्हा पासून तो घरी परतलाच नाही. आठ दिवसांपासून मुलगा गायब असल्याने सचिनची आई बेबीताई परमेश्वर शिंदे यांनी ४ जून रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर सचिनचा फोटो टाकून शोध मोहीम सुरु केली.

परळी ग्रामीण पोलिसांना ३१ मे रोजी रामनगर तांडा परिसरात जळालेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या हातावर स्नेहा नाव गोंदलेलं होतं. परळी पोलिसांनी शोध पत्रिका काढली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर नांदेडच्या विमानतळ पोलिसाचं एक पथक परळीला जाऊन शहानिशा केली. तेव्हा हे मृतदेह सचिन शिंदे या तरुणाच असल्याच निष्पन्न झालं आणि हत्येच कारण ही समोर आलं.

मित्रानेच केली सचिनची हत्या

सचिन शिंदे ज्या परिसरात राहत होता, त्याच परिसरात त्याचा मित्र दिलीप हरीसिंग पवार हा देखील राहत होता. दोघं जण व्याजाने दिलेले पैसे वसुली करण्याचे काम करत होते. दोघांमध्ये एक महिन्या पूर्वी वाद झाला होता. या वादातून सचिनने आरोपी दिलीप याला मारहाण केली होती. हाच राग मनात ठेवून दिलीप याने आपल्या एका मित्राच्या मदतीने सचिनचा निर्घृणपणे खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी डिझेल टाकून प्रेत जाळले. पोलिसांनी आरोपी दिलीप हरिसिंग पवार यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपीने गुन्हा केला. विशेष म्हणजे मयत आणि आरोपी या दोघा विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत.

अशी घडली घटना…

२९ मे रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास आरोपी दिलीप पवार हा त्याच्या चार चाकी वाहनातून सचिन शिंदेला घेऊन गेला होता. परभणीमार्गे सोनपेठ या ठिकाणी दिलीपचे नातेवाईक सचिन जाधव (रा. सोनपेठ जि. परभणी) यांच्याकडे गेले. सचिन जाधव याला वाहनामध्ये सोबत घेवून तिघेही परळी मार्गे परळी येथील मौजे रामनगर तांडा जवळ पोहोचले. तिघांनी दारू पिली त्यानंतर सचिन शिंदे याचा सचिन जाधव याने रूमालाने पाठीमागून गळा आवळला आणि दिलीप पवारने खंजीराने सचिन शिंदेच्या पोटात वार केले. त्यानंतर दोघांनी सचिन शिंदेला गाडीतून खाली फेकून देवून त्याच्या अंगावर डिझेल टाकून त्याला पेटवून दिले. बुधवारी विमानतळ पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप हरिसिंग पवार याला राहत्या घरून अटक केले आणि पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला पोलीस स्टेशन परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button