महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना इशारा, हवामानाचा ताजा अंदाज
मुंबई : दरवर्षी साधारण १ जून या सरासरी तारखेला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ४ दिवस उशिराने म्हणजे ४ जून रोजी अपेक्षित होता. त्यातही कमी-अधिक ४ दिवसाचा फरक धरून तो केरळात १ जून ते ८ जून या ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होऊ शकतो, असं भाकीत भारतीय हवामान खात्याकडून या वर्षी वर्तवण्यात आलं होतं. त्यानुसार मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे.
मान्सूची महाराष्ट्रातील एंट्री आणि तत्पूर्वी पडणाऱ्या पावसाविषयी हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. ‘मान्सून साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. मात्र यंदा तो ८ जूनला केरळात दाखल झाल्यामुळे १८ जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक धरला तर त्याचे आगमन मुंबईत १४ ते २२ जूनच्या दरम्यान केव्हाही होऊ शकते. मुंबईत मान्सून रुळल्यानंतर सह्याद्री ओलांडून नंतर तो उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो,’ असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार?
महाराष्ट्रात उद्या शुक्रवार दि. ९ जूनपासून पुढील ३ दिवस म्हणजे सोमवार दि. १२ जूनपर्यंत मुंबईसह कोकण, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात मराठवाडा, विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असंही माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे.
चक्रीवादळाविषयी काय आहे अंदाज?
‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ आज सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोलअरबी समुद्रात त्याचे ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा विशेष नुकसानकारक परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटते, अशी माहिती माणिकराव खुळेंनी दिली आहे.