देश विदेश

साठी १८ कोटींचं डील, ५० लाख ॲडव्हान्स? पूजा ददलानीच्या जबाबाने फिरलं समीर वानखेडेंचं नशीब

मुंबई- क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर खळबळ उडाली होती. आता दोन वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या संपूर्ण प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन झोनल हेड समीर वानखेडे हेच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. सध्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चा जुना जबाब समीर यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरला आहे.

पूजाचा हा जबाब गेल्या वर्षी १६ जून रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता अहवालाचा एक भाग होता. याआधारे CBI ने २०२१ च्या कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचाही समावेश आहे.

Aryan Khan Case

पूजाने दिलेल्या जबाबात खंडणी दिल्याचे मान्य केले होते. पूजाने जबाबात म्हटले होते की, या प्रकरणात त्यांनी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयांची बॅगही दिली होती. धक्कादायक म्हणजे हे सर्व कॉर्डेलिया क्रूझच्या छाप्याच्या काही तासांनंतरच घडले होते. एनसीबीच्या तपासानुसार, या प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले तेव्हा अधिकाऱ्यांकडून २५ कोटी रुपयांची खंडणीची मागणीही करण्यात आली होती. मात्र नंतर १८ कोटी रुपयांत सौदा ठरला होता. त्यासाठी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयेही देण्यात आले होते.

पूजा ददलानीने पोलिसांच्या समन्सकडे दुर्लक्ष केलेले

यापूर्वी, ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, या प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या पूजा ददलानीने तिचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या किमान तीन समन्सकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर समीर वानखेडेंविरुद्धचा पोलीस तपास बंद करावा लागला होता.

Aryan Khan Case

पूजा यांनी दक्षता पथकाला दिलेले निवेदन

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रिपोर्टमध्ये, तपासात सहभागी असलेल्या एका प्रमुख अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, ‘दक्षता पथकाने गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पूजा ददलानीशी संपर्क साधला, त्यानंतर तिने खंडणीच्या आरोपांबाबत तिचे म्हणणे नोंदवले. याशिवाय केपी गोसावी, सॅनविले डिसोझा आणि प्रभाकर साईल (साक्षीदार) यांचेही जबाब नोंदवले गेले.’

शाहरुखकडून पैसे उकळण्याचा झालेला प्रयत्न

अधिकाऱ्याला पूजाने तिच्या वक्तव्यात काय सांगितले असे विचारले असता, त्यांनी सांगण्यास नकार दिला. असं असलं तरी ते पुढे म्हणाले की, सर्व जबाब पाहता शाहरुखकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्यानंतर सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगण्यात आले.

Aryan Khan Case

सीबीआय पूजा ददलानीची चौकशी करू शकते

गेल्या आठवड्यात सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध खंडणीच्या कथित प्रयत्ना प्रकरणी एफआयआर नोंदवली. रिपोर्टमध्ये त्याच सूत्राच्या हवाल्याने म्हटले की, ‘एफआयआरची चौकशी करणारी सीबीआय टीम पूजा ददलानीच्या वक्तव्याची पुन्हा नोंद करेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की तीही तेवढंच सहकार्य करेल.’

प्रभाकर सेलनेही केलेली २५ कोटींच्या डीलची गोष्ट

सूत्राने वेबसाईटला सांगितले की, त्यांचा तपास लोकांच्या जबाबांसोबतच मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवर आधारित होता. या सगळ्याच्या मदतीने घटना कधी आणि कशा घडल्या त्या पाहिल्या जाऊ शकतात. यातील साक्षीदार प्रभाकर साईलचा एप्रिल २०२२ मध्ये मृत्यू झाला. प्रभाकर सेल शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या वक्तव्यावर ठाम होते की, क्रूझवर छापा टाकला त्या रात्री त्यांनी गोसावीला डिसूजाशी शाहरुखसोबतच्या २५ कोटींच्या डीलबद्दल बोलताना ऐकले होते. शेवटी ही डील १८ कोटींमध्ये ठरल्याचंही त्याने सांगितलं होतं.

प्रभाकर सेलने आपल्या निवेदनात पुढे दावा केला होता की गोसावी यांनी डिसोझा यांना सांगितले होते की, १८ कोटींपैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडेंसाठी होते. प्रभाकर सेल आणि गोसावी यांनी त्याच रात्री कथितरित्या डिसूजा, पूजा ददलानी आणि तिचे पती लोअर परेल येथे भेटले, जिथे रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्या हाती देण्यात आली.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रुझवर छापेमारी करण्यात आली

२००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे त्यावेळी एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर होते. त्यांनी २ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री मुंबई किनार्‍यावरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. एनसीबीने क्रूझकडून ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आर्यन खानसह १७ जणांना अटक करण्यात आली होती.

२६ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानची सुटका झाली

या प्रकरणी आर्यन खान २६ दिवस तुरुंगात होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. अखेरीस, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या आणखी एका पथकाने पुराव्याअभावी आरोपपत्रातून आर्यन खानचे नाव वगळले. मात्र, आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट अजूनही या प्रकरणात आरोपी आहे. अरबाजच आर्यनसोबत क्रूझवर गेला होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button