ठरलं! सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, डीके शिवकुमारांकडे ही जबाबदारी, ’20 मे’ला शपथविधी
बंगळुरू 18 मे : कर्नाटकात मुख्यमंत्र्यांबाबत सलग चार दिवस मंथन झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक सरकार स्थापनेसाठी एकमत केलं आहे. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 136 जागा जिंकल्या आहेत. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. दोघेही या पदावर आपला दावा ठामपणे सांगत होते. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यास नकार देत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कोर्टात चेंडू टाकला.
दोन्ही नेत्यांनी बुधवारी दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. संकट दूर करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या घरी सिद्धरामय्या आणि सुरजेवाला यांची बैठक झाली. बैठकीत प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाच्या वाटपासह अनेक सूत्रांवर चर्चा करण्यात आली. मात्र, डीके यांनी अशा कोणत्याही सूत्रांवर अनौपचारिकपणे नाराजी व्यक्त केली होती.
सिद्धरामय्या यांच्यानंतर शिवकुमार यांनीही बुधवारी रात्री सुरजेवाला यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष खर्गे यांच्या घरी केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सिद्धरामय्या रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सुरजेवाला यांच्याशी पुन्हा चर्चा केली. अनेक बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
दरम्यान, डीके शिवकुमार यांचा जिल्हा असलेल्या रामनगरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवरून त्यांचे समर्थक नाराज होऊन गोंधळ घालू शकतात, असे मानले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवकुमार यांच्या विधानसभा मतदारसंघ कनकापुरा येथे विशेष सुरक्षा वाढवण्यात आली आहे.