अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी, कोण जिंकलं कोण हरलं
मुंबई- पंचवार्षिक अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीचा निकाल अखेर आज लागला. या परिषदेचं अध्यक्षपद नक्की कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. त्यांना ६० पैकी ५० मतं मिळाली.
अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. या संपूर्ण निवडणूकीत ‘रंगकर्मी नाटक समूहा’चा दबदबा पाहायला मिळाला.
प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.
विजयी-
अध्यक्ष- प्रशांत दामले
सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
उपाध्यक्ष – नरेश गडेकर
उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
खजिनदार- सतीश लोटके
पराभूत-
प्रसाद कांबळी
सुकन्या कुलकर्णी
ऐश्वर्या नारकर
अविनाश नारकर
कोणाला कोणते पद मिळाले-
नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. यासोबतच कोणत्या पदासाठी कोण निवडून आले तेही सांगितले. ते म्हणाले की,’नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी अजित भुरे, तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली.’