विमानात २०० प्रवासी, विमानतळावरून टेकऑफ घेताच पक्षी धडकला अन्…
नागपूर : इंडिगो एअरलाइन्सचे नागपूर-पुणे (क्रमांक ६३१३५) या विमानाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेताच पक्षी धडकल्याचा प्रकार सोमवारी घडला. पायलटच्या प्रसंगावधनाने कुठलीही दुर्घटना घडली नाही.
नागपूर विमानतळ आणि पशुपक्ष्यांचा वावर नवीन नाही. यापूर्वी रनवेवर डुक्कर, हरीण, पक्षी आढळल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारच्या घटनेने विमानतळावरील अशा जुन्या घटनांना उजाळा मिळाला. सोमवारी इंडिगोच्या नागपूर-पुणे विमानाने निर्धारित वेळेनुसार दुपारी १ वाजतादरम्यान टेकऑफ केले. तोच एक पक्षी विमानाला धडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार वैमानिकाने तातडीने विमान धावपट्टीवर उतरविले. वैमानिकाने घेतलेल्या निर्णयामुळे दुर्घटना टळली. या विमानात जवळपास २०० प्रवासी होते. या सर्वांची दुसऱ्या विमानात सोय करण्यात आली. मुंबईला जाणाऱ्या विमानात प्रवाशांना समाविष्ट करण्यात आले. दुपारी ४ वाजता विमान पुण्याच्या दिशेने उडाले. तर मुंबईच्या प्रवाशांसाठी असलेल्या पर्यायी विमानाने सायंकाळी ६ वाजता उड्डाण भरले.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
विमानतळावरील या घटनेसंदर्भात मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तांत्रिक कारणांमुळे नागपूरहून पुण्याला उडणारे विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तर इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी पक्षी धडकल्यामुळे विमान रद्द झाल्याच्या घटनेला दुजोरा देण्यास नकार दिला. मुख्य म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनेबाबत टोलवाटोलवी केली.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी १५ सप्टेंबर २०१५ रोजी नागपुरात कार्यक्रमासाठी आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरत असताना धावपट्टीवर अचानक आठ डुकरे पुढे आली होती. विमानाच्या पायलटने प्रसंगावधान राखल्याने त्या संकटातून प्रणव मुखर्जी थोडक्यात बचावले होते. विमानतळ परिसरात गवत कापलेले असावे, रनवेची तपासणी नियमित व्हावी, पक्षी असल्याचे दर्शविणारे मशिन लावण्यात यावे, ऑपरेशनल एरियात स्वच्छता राखण्यात यावी तसेच विमानतळाबाहेरील परिसरात पशुपक्ष्यांचा वावर रोखण्यात यावा अशा अधिसूचना डीजीसीएकडून नियमितपणे देण्यात येतात. त्यानंतरही घडलेल्या या प्रकाराने विमानतळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.