शिक्षण
पर्यावरण संवर्धन जागृती शिवाय शाश्वत विकास अशक्य-डॉ.बिंबिसार
मुजामपेठ दि.२१ पर्यावरण संवर्धन केल्याशिवाय शाश्वत विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे युवकांनी पर्यावरण संवर्धन करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तरच शाश्वत विकास होऊन येणाऱ्या पिढीला देखील नैसर्गिक साधन संपत्तीचा आनंद घेता येईल. असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील डॉ. बिंबिसार वाघमारे यांनी केले ते कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मौजे मुजामपेठ-धनेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवशीय विशेष वार्षिक शिबिराच्या उद्बोधन वर्गात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजामपेठ चे मुख्याध्यापक श्री बळीराम बुकटे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुकतरे यांनी केले.
पुढे बिंबिसार वाघमारे म्हणाले की,आज मानवी प्रवृत्ती ही अताताई स्वरूपाची बनली आहे प्रत्येक गोष्टीचा वाजवी पेक्षा जास्त संग्रह करून ठेवला जात आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली अन्नसाखळी ही कृत्रिम अडथळे निर्माण करून अडचणीत आणली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून वातावरण दूषित होत आहे. हे थांबवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जागरूकपणे कार्य केले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रा.डॉ.विजय तरोडे यांनी देखील भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारा विषयी नागरिकांमध्ये असलेली उदासीनता दूर झाली पाहिजे कारण नागरिकांना जोपर्यंत आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव होणार नाही तोपर्यंत विकासात्मक कामे नियमाप्रमाणे होणार नाहीत. यामुळे संविधान जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. मुख्याध्यापक बुकटे यांनी समायोजित विचार व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला.सूत्रसंचालन प्रा.शेख नजीर यांनी केले तर आभार प्रा.सय्यद सलमान यांनी मानले.कार्यक्रमास प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.स्मिता कोंडेवार,प्रा.अक्षय हासेवाड, प्रा.महंमद दानिश, प्रा.मोहम्मद आतिफोद्दीन,प्रा. नुरी बेगम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील स्वयंसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.