बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी – प्रा.डॉ.भागानगरे
मुजामपेठ दि.21 बँकिंग क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा युवकांनी लाभ घेऊन आपले रोजगार मिळवण्याचे स्वप्न साकार करावे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. शिवाजी भागानगरे यांनी व्यक्त केले. ते कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मुजामपेठ येथे आयोजित विशेष वार्षिक शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. फर्जना बेगम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.संतोष राठोड हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भूकतरे यांनी केले. पुढे डॉ. भागानगरे म्हणाले की बँकिंग क्षेत्र हे असे क्षेत्र आहे ज्या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
युवकांनी नियोजनबद्धपणे अभ्यास केला तर आयबीपीएस व एसबीआय द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत यश संपादन करून लिपिक व अधिकारी हे पद सहज मिळवता येते. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी दुसरे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.संतोष राठोड यांनी भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जातील त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान स्नेही बनले पाहिजे. तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याचा कुशलतेने वापर केला पाहिजे, कारण भविष्यात आर्थिक व्यवहाराची गुरुकिल्ली हे तंत्रज्ञानच राहणार आहे असे त्यांनी म्हटले. सूत्रसंचालन प्रा.अक्षय हासेवाड यांनी केले तर आभार रासेयो स्वयंसेवक अबुझर गफारी यांने मानले. यावेळी कार्यक्रमास प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.मोहम्मद दानिश, प्रा.मोहम्मद आतिफुद्दीन,प्रा. सय्यद सलमान,प्रा.शेख नजीर, आयशा बेगम,मोहम्मदी बेगम,मोहम्मद मोहसिन,फरदीन खान,महंमद दानिश यांच्यासह शिबिरातील शिबिरार्थी विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.