नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक बुंगई यांना निलंबित करण्याची मागणी….!
नांदेड, (प्रतिनिधी) दि.०७ मार्च- नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथील अखंडपाठ गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांमध्ये गैरव्यवहाराचा ठपका असलेले गुरुद्वारा अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांना निलंबित करून चौकशी निष्पक्ष होण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे करण्यात आली आहे.
नांदेड येथील सिख धर्मियांची दक्षिणकाशी मानल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारामध्ये अनेक भाविक देश विदेशातून आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याने श्रद्धेपोटी अखंड पाठ करतात. परंतु 2017 ते 19 च्या दरम्यान अखंडपाठ न करता तत्कालीन गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक ठाणसिंघ बुंगई व त्यांच्या कर्मचा-यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. चौकशीअंती तत्कालीन गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्षांनी ठाणसिंग बुंगई यांना दोषी ठरवून निलंबित केले होते परंतु काही काळाने त्यांना पुन्हा त्याच पदावर घेण्यात आले. याबाबत उल्हासनगर येथील अॅड. अमृतपालसिंघ खालसा यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये कारवाई करण्यासाठी याचिका क्र- 1915/2023 दाखल केली. यावर माननीय उच्च न्यायालयाने दि. 4 मार्च 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अखंडपाठ गैरव्यवहारामध्ये मुख्य दोषी असल्याचा ठपका असलेले गुरुद्वारा बोर्ड ठाणसिंघ बुंगई हे आता देखील कार्यरत आहेत. त्यामुळे 2017 ते 19 च्या कागदपत्रांमध्ये फेरबदल करून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अखंड पाठ गैरव्यवहारांमध्ये मुख्य दोषी असल्याचा ठपका असलेले ठाणसिंघ बुंगई यांना निलंबित करावे अशी मागणी जगदीपसिंघ नंबरदार, जसबीरसिंघ बुंगई, बीरेंद्रसिंघ बेदी, दिपकसिंघ गल्लीवाले, मनबिरसिंघ ग्रंथी, प्रेमजितसिंघ शिलेदार, नानकसिंघ सरदार, जगजीतसिंघ खालसा यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ यांच्यासह जिल्हाधिकरी, पोलीस अधिक्षक, यांना निवेदनाद्वारे केली आहे…..