देश विदेश

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

परभणी: अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ साली मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर अकरा मागण्यांसाठी सरकार विरोधात पहिला मोर्चा काढला होता. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. पण सरकार त्यांना न्याय देण्याच्या तयारीत नाही. त्यांना मराठा आरक्षण मिळवायचे असेल, या आंदोलनाला यश मिळवायचे असेल तर त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल. अन्यथा त्यांच्या आंदोलनाचा अण्णासाहेब पाटील होऊ शकतो असा गंभीर सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर परभणी येथे ओबीसीच्या एल्गार मेळाव्यासाठी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर इंजिनियर सुरेश फड डॉक्टर धर्मराज चव्हाण सुरेश शेळके हे प्रमुख उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये न जाता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षाचा तिकीट घेऊ नये कारण त्या पक्षाची मर्यादा असते, त्यांची ध्येयधोरणे असतात. जरांगे पाटील यांना आपल्या आंदोलनात यश मिळवायचे असेल तसेच आंदोलन कायम ठेवायचे असेल तर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरले पाहिजे. अन्यथा निवडणुकीनंतर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होऊ शकते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जरांगे पाटलांचे आंदोलन वास्तववादी

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वास्तववादी आहे. ४० एकर जमीन असलेला मराठा आज दोन आणि तीन एकर जमिनीवर आलेला आहे. दुसरीकडे सरकार कृषी मालाला आधारभूत किंमतही देत नाही. त्यामुळे मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे पण मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसींच आरक्षण हे स्वतंत्र असलं पाहिजे. या दोन्ही समाजाला आरक्षणाचे वेगवेगळे ताट असलं पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे मराठा समाज भक्कमपणे उभा आहे. या आंदोलनाची तीव्रता लोकांमध्ये कमी झालेली नाही. पण सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही.

महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली नसून केवळ आम्ही निमंत्रक आहोत. कारण आम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये ३९ जागांवर कोणी लढायचे याची सहमती झाली आहे. उद्या २७ रोजी महाविकास आघाडीची बैठक आहे पण आमच्या पक्षाचा पुण्यामध्ये कार्यक्रम असल्याने आम्ही त्या बैठकीला जाऊ शकत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच मी अकोला लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button