उस्तादजींची पुनर्भेट राहिली अधुरी…
परभणी,( जिल्हा प्रतिनिधी ) : संमेलन नगरीत ओंकारोत्सवाच्या निमित्ताने विख्यात गायक उस्ताद राशीद खान यांच्या रंगलेल्या शिखर मैफिलीसह चालण्या-बोलण्यातील या दिग्गज कलावंताची सहजता अन् ‘मै परभणी मे दोबारा आवश्य आऊंगा, वो भी बिना बिदागी के’ या दिलेल्या शब्दाने परभणीकर अक्षरशः फिदा झाले खरे, परंतु उस्तादजींच्या एक्झीटमुळे दुसरी भेट अधुरीच राहीली…..
प्रख्यात गायक उस्ताद राशीद खान यांचे नाव आणि गायन परभणीकर केवळ एकून होते. कधी त्यांच्या भेटीचा आणि मैफिलिचा आनंद लुटता येईल, याची अपेक्षासुध्दा परभणीकरांच्या स्वप्नीही नव्हती. परंतु, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांनी परभणीत संगीत संमेलनाचा विडा उचलला अन् ओंकारोत्सवाच्या निमित्ताने तीन दिवशीय संगीत संमेलन सर्वार्थाने यशस्वी करीत परभणीकरांसह मराठवाडावासीयांना आनंदाचा सुखद धक्का दिला.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे पंडीत जसराज, उस्ताद राशीद खान व हरिप्रसाद चौरसिया या तीघांच्या तिन दिवस शिखर मैफिली. त्यापैकी एक उस्ताद राशीद खान, ज्यांना परभणी शहराची ओळखही नव्हती. परंतु, संगीत चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मल्हारिकांत देशमुख यांनी उस्ताद राशीद खान यांना सहजपणे मोबाईलद्वारे थेट संपर्क केला, आश्चर्याचा धक्का असा एका कॉलवरच उस्तादजींचा होकार मिळाला. तोसुध्दा कुठल्याही आढेवेढे न घेताच.
दिलेल्या शब्दाप्रमाणे उस्ताद राशीद खान हे परभणीत दाखल झाले. तेव्हा आयोजिकांसह परभणीकर रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचे यजमानांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्या स्वागताने ते भारावले. उस्ताद राशीद कलावंत म्हणून जेवढे मोठे तेवढेच एक व्यक्ती म्हणून त्यांची उंची प्रत्येकक्षणी जाणवत होती. या प्रतिभासंपन्न गायकाचे गाणे, वागणे, स्वभावातील लावकेपणा अजूनही आयोजक व रसिकांच्या अंतःकरणात आहे.
आयोजकांची टीम मुंबईत असतांना उस्ताद राशीद खान यांच्याशी संपर्क करण्यासाठी मल्हारिकांत देशमुख यांनी त्यांचा दुरध्वनी क्रमांक तत्कालीन उपायुक्त दिलीप शिंदे यांच्याकडून मिळवला. दुरध्वनी क्रमांक तपासण्यासाठी म्हणून त्यांनी कॉल करुन पाहिला. दुसर्या क्षणी तिकडून कॉल आला. त्यांचा स्वीय सहाय्यक किंवा विद्यार्थी बोलत असेल असे वाटत असतांनाच ‘बोलिये, मै राशीद खान बात कर रहा हू.’ हे शब्द ऐकताच सगळी टीम हादरली आणि त्या एका कॉलवर राशीद खान यांचे परभणीत येणे निश्चित झाले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या अगत्यशीलपणावर उस्तादजी एवढे प्रसन्न झाले की, ‘मै अगलीबार आपके शहर बिना बिदागीके आऊंगा,’ असा त्यांनी शब्द दिला होता. त्याहीपुढे मुंबईतील इंडिया गेटवर आयोजित केलेल्या एका मैफिलीचे आमदार देशमुख यांना खुद्द उस्ताद राशीद खान यांनी निमंत्रित केले. त्या निमित्ताने परभणीतील अभूतपूर्व अशा स्वागताच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यापुढे स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असतांना वर्षा या शासकीय निवासस्थानावर आमदार देशमुख यांच्या माध्यमातून आयोजित उस्तादजींची मैफिल स्व. विलासराव देशमुख यांच्यासह सहकारी श्रोत्यांना भारावणारीच ठरली. परंतु, उस्तादजींनी परभणी शहराच्या पुनर्भेटीचा दिलेला शब्द पूर्ण होवू शकला नाही. आणि अतिशय उमेदीच्या काळातच या कलावंताचा इहलोकीचा प्रवास संपुष्टात आला.
उस्तादजींच्या परभणीतील आठवणी…
तीन दिवसांच्या संगीत संमेलनात दुसर्या दिवशीची उस्ताद राशीद खान यांची शिखर मैफल यादगार ठरली. त्यांनी राग बागेश्री अतिशय सूरेल पध्दतीने पेश केला होता. उशीरापर्यंत झालेल्या या मैफिलीस किमान दहा हजारांवर प्रेक्षक उपस्थित होते. औरंगाबाद खेरीज त्यांची मैफिल मराठवाड्यात तोवर कुठेही झालेली नव्हती. मैफिली पश्चात उस्ताद राशीद सावली विश्रामगृहावर पोहचले. रात्री जेवण झाल्यानंतर बंद खोलीत उत्तररात्री पुन्हा एकदा मैफल सुरु झाली. त्या ठिकाणी फक्त आयोजकाची टीम उपस्थित होते. या प्रसंगीची ऋद्य आठवण म्हणजे आमदार सुरेश देशमुख यांच्या वाहनावरील चालक शमी भाई व लाला भाई यांच्या फर्माईशीवरुन उस्तादजींनी ‘आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे’ हे त्यांनी गायलेले जब वी मेट या चित्रपटातील गीत सादर केले. आणि पुढे हा सिलसिला कितीतरी वेळ चालत राहीला. छायाचित्रकार स्व. नंदु प्रभुणे यांच्या आग्रहाखातर त्यांनी चक्क महेबुबा चित्रपटातील ‘मेरे नैना सावन भादो’ गीत प्रस्तूत केले. त्या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांच्यावर जाम फिदा झाले होते.
‘हमें खाने, खिलानेमें मजा आता है,’
उस्ताद राशीद खान यांच्या आठवणी जागवतांना पत्रकार मल्हारिकांत देशमुख म्हणाले की, मी सर्वप्रथम त्यांना ऐकले ते औरंगाबादच्या वेरुळ महोत्सवात. त्यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार होती व दुसर्या दिवशी ते नांदेड येथे जाणार होते. दरम्यान, औरंगाबाद येथील रामा इंटरनॅशनल हॉटेलवर ते मुक्कामी असतांना मी त्यांची लोकमतसाठी त्यांची मुलाखत घेतली होती. महोत्सव संपल्यानंतर नांदेडला मी तुमच्या सोबत आलो तर चालेल का? असे विचारताच ‘बेशक, हमे कोई ऐतराज नाही’ असे म्हटल्यामुळे मी रात्री 1 वाजता त्यांच्या गाडीतून नांदेडसाठी निघालो. नांदेड येथेही त्यांची सुरेल मैफिल झाली होती. पाच तासाचा प्रवास गप्पा-टप्पा मारत उस्तादजींसोबत घडला. जिथे कुठे रात्री हॉटेल उघडी असेल तिथे उतरुन ते सामान्य माणसासारखे चहा घेत असत. उस्तादजींना पान खाण्याचा भारी शोक. त्यांच्याजवळ कलकत्ता पानाचे बंडल असे. आपला पानपुडा समोर करत, ‘हमें खाने, खिलानेमें मजा आता है,’ असे ते म्हणत.