क्राईम

अतिक्रमण धारकांनी केलेल्या हल्यात व्यापार्‍याचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू

किनवट दि. (तालुका प्रतिनिधी) : अतिक्रमन केलेले टीनपत्राचे घर खाली करण्यासाठी गेलेल्या दोन व्यापार्‍यांवर अतिक्रमण धारकांनी केलेल्या हल्यात एका व्यापार्‍याचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांनी ह्या प्रकरणातील चौकशीस विलंब लावणार्‍या पोलिस अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी केली तर आरोपींना अटक करून तपासामध्ये दिरंगाई करणार्‍या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी करीत दि. 29 डिसेंबर रोजी आर्यवैश्य समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व किनवट व्यापारी असोसिएशन ह्यांच्यातर्फे किनवट गोकुंदा बंदची हाक दिली आहे. आज किनवट शहरातील व्यापारपेठ व सराफा बाजार कडकडीत बंद होता.
ह्या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की दि. १२-१२-२०२२ रोजी किनवट शहरातील रंगवैभव सिलेक्शन ह्या कापड दुकानाचे मालक व्यंकटेश भूमन्ना कंचर्लावार हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन अनधिकृत केलेले अतिक्रमण काढून घ्या असे सांगत असताना त्यांच्यावर अचानक संगनमत करून विकास अशोक कोल्हे, विशाल अशोक कोल्हे, संतोष शिवराम कोल्हे, किशोर शिवराम कोल्हे, अशोक शिवराम कोल्हे ह्या पाच जणांनी मिळून लाठयाकाठ्या दगडांनी व्यंकटेश कंचर्लावार ह्यांना मारहाण केली असता त्यांनी आपले बंधु अक्षय ज्वेलर चे मालक श्रीकांत भूमन्ना कंचर्लावार ह्यांना घटनेबाबत माहिती देऊन मदतीसाठी तत्काळ बोलवून घेतले असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणार्‍या आरोपींनी श्रीकांत कंचर्लावार ह्यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. ह्या घटनेनंतर त्यांना लगेच प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दाखल केले असता दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले.

 

दि.१२ डिसेंबर पासून मृत्युशी झुंज देणारे सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार ह्यांचा उपचारादरम्यान दि.२७ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तर त्यांचे लहान बंधु व्यंकटेश ह्यांची प्रकृती स्थिर आहे असे कळते. ह्या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली असून दहशतीचे वातावरण आहे.
घटनेच्या दिवशी रमेश विठ्ठल नेमाणीवार ह्यांनी दिलेल्या फिर्‍यादिवरून सदरील आरोपींच्या विरोधात किनवट पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र आरोपींचा शोध घेवून त्यांना जेरबंद करणे किनवट पोलिसांना का जमले नाही असा सवाल व्यापारी असोसिएशनने उपस्थित केला आहे. ह्या घटनेच्या नंतर लगेच व्यापारी असोशीएशन किनवट ह्यांनी निवेदन देऊन ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती पण पोलिस आरोपींचा शोध घेण्यात असमर्थ ठरले व त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दि. २७ डिसेंबर रोजी श्रीकांत कंचर्लावार ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य आर्यवैश्य समाज संघटनेच्या वतीने ना. वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी ह्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांच्याशी आज दि. २८ रोजी पत्रव्यवहार करून ह्या गुन्ह्याच्या तपासात विलंब करणारे किनवटचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके ह्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांचे विरूद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी व यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे किनवट शहरात दहशत निर्माण झाली असून अश्या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून सत्वर कार्यवाही होणे आवश्यक आहे. ती न झाल्याने पोलिस व्यवस्थेविरुद्ध प्रचंड नाराजीचे वातावरण तयार झाले आहे असे मुनगंटीवारांनी पत्रात नमूद केले आहे.
आज किनवट शहरातील किराणा भुसार, सराफा असोशीएशन व महाराष्ट्र आर्यवैश्य समाज महासभेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आमदार भीमराव केराम ह्यांना निवेदन देऊन उद्या दि.२९ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे व जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस स्टेशनला ठेवू व त्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका बंदची हाक दिलेल्या सर्व संघटनांनी घेतली आहे.

 

 

मयत श्रीकांत कंचर्लावार ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून २ डोळे, २ किडनी, यकृत, ह्रदय, फुफुसे दान करण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा मृतदेह आज रात्री उशिरा किनवट येथे आणण्यात येणार असून उद्या दि.२९ डिसेंबर रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. या प्रकरणी ह्या तीन आरोपींच्या विरोधात गुरन/240/2022 कलम 360 324 143 147 148 149 504 506 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून मयत श्रीकांत ह्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ह्या गुन्ह्यात 302 कलम वाढवण्यात येईल असे पोलिसांनी संगितले. ह्या प्रकरणी पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार हे ह्या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.
ह्या गुन्ह्यातील 5 आरोपीपैकी किशोर शिवराम कोल्हे व अशोक शिवराम कोल्हे ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ह्या गुन्ह्यातील संतोष शिवराम कोल्हे, विशाल अशोक कोल्हे, विकास अशोक कोल्हे हे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button