१५ दिवसांपुर्वी लग्न अन् आज दोघांचही संपल जीवन, सांगलीच्या दाम्पत्याचा कर्नाटकमध्ये दुर्देवी अंत
इस्लामपूर : कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये देवदर्शनाला गेलेले नवदाम्पत्य जागीच ठार झाले. तर कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत.
हा अपघात शनिवारी दुपारी 3वाजण्याच्या सुमारास घडला. कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला ढमणगे कुटुंब गेले होते. इंद्रजित मोहन ढमणगे (29), कल्याणी इंद्रजित ढमणगे (24, दोघे रा. किसाननगर, इस्लामपूर) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. मृत इंद्रजीत यांचे वडील मोहन (65) व आई मिनाक्षी (59) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, इंद्रजित व कल्याणी यांचा 18 तारखेला विवाह झाला होता. विवाहानंतर ते कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना गुर्लापूर ता. मुडलंगी जवळील हलूर येथे आले असताना समोरून येत असलेल्या ट्रकला त्यांच्या कारची जोराची धडक बसली.
या धडकेत इंद्रजित व कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर इंद्रजितचे वडील मोहन आणि आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले आहेत. मोहन यांचा हात फॅक्चर असून त्यांच्या डोक्याला ही गंभीर इजा झाली आहे. तर त्यांच्या पत्नी मिनाक्षी यांचा पाय फॅक्चर होवून डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी हे आहे. तर इंद्रजित हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीस होते. रविवारी पहाटे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. जखमी मोहन व मिनाक्षी यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या भीषण अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.