राजकारण

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शरद पवार भेटीनंतर स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘एकनाथ शिंदेंनी मला…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा सुरु होती. बच्चू कडू महायुतीत नाराज असून, लवकरच बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच या भेटीमुळे चर्चेला जोर मिळाला आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी भेटीनंतर ‘झी 24 तास’शी संवाद साधताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाविकास आघाडीत जाण्याचा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

शरद पवार दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज शरद पवार भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांमध्ये शेतकऱ्यांसंबंधी चर्चा झाली. प्रहारचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार रवींद्र वैद्यही चर्चेत सहभागी झाले होते. 

या भेटीबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, “मदतीची जाणीव म्हणून मी त्यांना आमंत्रण दिलं होतं. जर ते दुसऱ्या मार्गाने जात असते तर फोन केला नसता. पण मला पोलिसांकडून ते घऱासमोरुनच जाणार असल्याचं समजलं असल्याने फोन केला होता. या मतदारसंघावर त्यांचे उपकार असल्याने मी त्यांना चहा पाण्यासाठी बोलावलं होतं”. 

“राजकीय गोष्टी मीडियाला सांगून केल्या जात नाहीत. तशी चर्चा करण्याचं काही कारणही नाही. लोकसभा निवडणूक अजून लांब आहेत. तोपर्यंत काय खलबतं होतील हे माहिती नाही. ढग आल्यानंतर माणूस सर्व व्यवस्था करतो. पण अद्याप तशी परिस्थिती आलेली नाही. अद्याप काही आलंच नाही, त्यामुळे आतापासून त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही,” असं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

“संत्र्याला राजकीय ताकद मिळालेली नसून ती मिळण्याची गरज आहे. द्राक्षाप्रमाणे संत्र्याचीही अवस्था झाली असल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी आपण एकदा बसून चर्चा करु असं सांगितलं. कांदा निर्यातबंदीवरही आम्ही चर्चा केली,” अशी माहिती बच्चू कडूंनी दिली. 

दरम्यान  महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भविष्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याचा काही प्रश्न नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत ते शक्य नाही. त्यांचे महाराष्ट्रावर ऋण आहेत. त्यांनी मला अपंग मंत्रालय दिलं असून, ते मुख्यमंत्री असताना असं काही करणं योग्य नाही”.

दरम्यान लोकसभा जागा लढवण्याचं निश्चित केलेलं नाही. तशी मागणीही केलेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नेमकं काय केलं पाहिजे याबाबत चर्चा करु असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button