पुणे सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं, विमाननगरमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट
पुणे :विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने घबराट उडाली होती
विमाननगर भागातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारत आहे. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे बांधकाम मजूर राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बांधकाम मजुरांच्या वसाहतीत (लेबर कॅम्प) आग लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटानंतर परिसरात घबराट उडाली. वसाहतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाहतीतील छोट्या घरात जवळपास १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली होती. आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेसंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मिळालेल्या माहितीनुसार जिथं आग लागली आणि स्फोट झाले त्या ठिकाणी १०० सिलेंडर ठेवलेले होते. त्यापैकी १० सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कुलिंगचं काम सुरु करण्यात आलं आहे.
बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा ?
विमाननगरमध्ये ज्या ठिकाणी आग लागली तिथं १०० सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. हा साठा बेकायदेशीर रित्या करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील विमाननगरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडर का एकत्र ठेवण्यात आले होते हा प्रश्न निर्माण झाला आहे.