चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अखेर मौन सोडलं; करोनासंदर्भात दिली माहिती
बीजिंग – चीनमधील करोना स्थितीबाबत काही भीतीदायक आकडे आणि भाकिते प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच या संदर्भात उघडपणे मतप्रदर्शन केले आहे.
लोकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजना करण्याच्या सूचना जिनपिंग यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. चीनमधील वादग्रस्त “झिरो कोविड’ धोरण शिथील केल्यानंतर तीन आठवड्यांनंतर जिनपिंग यांनी करोनाच्या स्थितीबाबत भाष्य केले आहे.
“करोनाचा संसर्ग रोखणे आणि प्रतिबंध हे चीनमध्ये नवीन उद्दिष्ट ठरले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला अधिक देशभक्तीने मोहिम राबवावी लागेल. संसर्ग रोखण्याबरोबर लोकांचे जीव वाचवण्याचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करावे लागेल.’ असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे.
चीनमध्ये सध्या वेगाने करोनाचा संसर्ग पसरू लागला असून वेळीच त्याला आळा घातला गेला नाही, तर आगामी काही महिन्यात किमान 20 लाखल जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज काही आरोग्य सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आला आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची लक्षणे
करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयांमध्ये दाखल व्हायला लागल्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येऊ लागला आहे. रुग्णांना दाखल करून घ्यायला रुग्णालयांची 7मता अपुरी पडायला लागली आहे. खाटांची संख्या कमी पडायला लागली आहे. काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना जमिनीवरच झोपवून उपचार केले जात आहेत. ऑक्सिजन आणि वीजेवर चालणाऱ्या उपकरणांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अतिदक्षता विभागांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक रुग्णांची बरती होऊ लागली आहे. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.