स्पोर्ट्स
हॉकी – पटियाला, नाशिक, पुणे, ईएमई जालंधर विजयी दिल्ली पोलीस संघाचा मोठा विजय !
रविंद्रसिंघ मोदी
नांदेड दि. 25 डिसेम्बर : येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट मध्ये चौथ्या दिवशी साखळी सामन्याच्या सत्रात रविवारी पीएसपीएल पटियाला, आर्टलेरी सेंटर नाशिक एक्सेलेंसी हॉकी अकाडेमी पुणे, सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली आणि ईएमई जालंधर संघांनी उत्कृष्ट खेळाच्या बळावर आपल्या प्रतिद्वंदी संघांवर मात केली. उद्या साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस असून सायंकाळी क्वार्टर फायनल साठी आठ संघांची निवड केली जाईल अशी माहिती दुष्ट दमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष व हॉकी स्पर्धेचे मुख्य संचालक नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी दिली.
आज खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पीएसपीएल पटियाला संघाने साई एक्सेलेंसी औरंगाबाद संघाचा 2 विरुद्ध 1 गोल फरकाने पराभव केला. पटियाला संघातर्फे सुखप्रीत सिंघ आणि सुखवंतसिंघ यांनी मैदानी गोल केले. तर औरंगाबाद संघातर्फे भारत भारद्वाज याने पेनल्टी कार्नर मध्ये गोल नोंदवला. दुसऱ्या सामन्यात आर्टलेरी सेंटर नाशिक संघाने शैलीदार खेळाचे प्रदर्शन करत सुफियान हॉकी क्लब अमरावती संघाविरुद्ध 3 विरुद्ध 0 गोल फरकाने एकतर्फा विजय नोंदवला. अमरावती संघास एकही गोल करता आले नाही.
आजच्या तिसऱ्या सामना एक्सेलेंसी हॉकी अकाडेमी पुणे संघाने आश्चर्यकारक रित्या वेस्टर्न रेलवे मुंबई संघावर 3 विरुद्ध 0 गोलाने मात केली. रेलवेचा संघ बलाढ्य मानला जातो. पुणे संघाच्या अथर्व कांबळे, धैर्यशील जाधव आणि आदित्य रसाला यांनी आपल्या संघासाठी गोल केले. आजच्या चौथ्या सामन्यात सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली संघाने भुसावल रेलवे बॉयज संघाचा 7 विरुद्ध 1 गोल फरकाने धुव्वा उडवून दिला. दिल्लीच्या मोहम्मद वसीउल्लाह खान याने संघासाठी हैट्रिक नोंदवली. तर शमशेर याने दोन गोल करत चांगली साथ दिली. जसकरण सिंघ आणि दीपक यांनी एक – एक गोल केला. तर भुसावल संघातर्फे तौसीफ कुरैशी याने पेनल्टी स्ट्रोक मध्ये एकमात्र गोल केला.
आजचा शेवटचा आणि पाचवा सामना ईएमई जालंधर आणि आर्टलेरी सेंटर सिकंदराबाद यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघानी उत्कृष्ट अशा हॉकी खेळाचे प्रदर्शन केले. खेळाच्या 33 व्या मिनिटाला सिकंदराबाद संघाच्या सुशील ढाका याने मैदानी गोल करून आघाडी मिळवून दिली होती. पण जालंधर संघाने 37 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोक अंतर्गत मनिंदरसिंघ याने गोलात रूपांतरित करून बरोबरी साधली. संघर्षपूर्ण खेळात 50 व्या मिनिटाला जालंधरच्या पंकज यांने मैदानी गोल करून संघास निर्णायक आघाडी दिली.
उद्या साखळी सामने संपणार असून उपउपांत्य फेरी साठी गुणतालिका अनुसार आठ संघांची निवड केली जाईल. असे गुरमीतसिंघ नवाब यांनी सांगितले. हॉकी स्पर्धा संचलनात हॉकी कमेटीचे उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, महिंदर सिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चिमा, विजय नंदे सह सेवाभावी युवक मंडळी परिश्रम घेत आहेत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक हॉकी खेळाचे आनंद आत्मसात करीत आहेत.