बातमी : पंजाब पोलीस आणि इटावा संघाने दिवस गाजवला मुंबईचे दोन्ही संघ विजयी
नांदेड दि. 23 (रविंद्रसिंघ मोदी)
येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर हॉकी टूर्नामेंट अंतर्गत दुसऱ्या दिवशी पंजाब पोलीस जालंधर आणि सैफई हॉस्टल इटावा संघाने दिवस गाजवला. आज झालेल्या एका सामन्यात पंजाब पोलीस संघाने डेक्कन हैदराबाद संघाचा 6 विरुद्ध 2 असा धुव्वा उडवून दिला. तर सैफई हॉस्टल इटावा संघाने नांदेडच्या चारसाहेबजादा अकैडमी संघाचा 8 विरुद्ध 1 अशा गोलने धुव्वा उडवून दिला. तसेच आज मुंबईचे दोन संघ आणि दिल्ली रिजर्व पोलीस संघास संघर्षपूर्ण सामन्यांना सामोरे जावे लागले.
शुक्रवार रोजी साखळी सामन्यान्तर्गत पहिला सामना वेस्टर्न रेलवे मुंबई आणि सुफियान हॉकी क्लब अमरावती संघात खेळला गेला. वेस्टर्न रेलवे मुंबई संघाने मोठ्या संघर्षानंतर राजिन कंडुलना याच्या हैटट्रिकच्या मदतीने हा सामना 3 विरुद्ध 2 अशा गोल फरकाने जिंकला. खेळाच्या सुरुवातीला दुसऱ्याच मिनिटाला सुफियान क्लब अमरावतीच्या शेख फैजान याने मैदानी गोल करून आघाडी मिळवली. पण 40 व्या मिनिटाला रेलवे मुंबईच्या राजिन कंडुलना याने मैदानी गोल करत बरोबरी साधली. 40 व्या मिनिटाला अमरावतीच्या अमीर सोहेल ने पेनल्टी कार्नरला गोल मध्ये रूपांतरित केले आणि आघाडी घेतली. पण राजिन कंडुलना यांने 49 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल करून हैट्रिक तर साधलीच पण संघाला विजय मिळवून दिला.
आजचा दूसरा सामना सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली आणि साईं एक्सेलेंसी औरंगाबाद संघात खेळविला गेला यात दिल्ली पोलीस संघास 2 विरुद्ध 1 गोल फरकाने संघर्षपूर्ण विजय टिकवता आला. दिल्ली पोलीस संघातर्फे कौशल यादव याने खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. साईं औरंगाबाद संघाने चांगलाच प्रतिकार करत 39 व्या मिनिटाला अंकित गौड याच्या गोलच्या मदतीने बरोबरी साधली. दोन्ही संघानी एकमेकांवर चांगलेच हल्ले चढवले. खेळाच्या 53व्या मिनिटाला हरीश पाल याने केलेल्या गोलाच्या मदतीने दिल्ली पोलीस संघास वर्चस्व टिकवता आले.
तिसरा साखळी सामना बलाढ्य कस्टम मुंबई संघ आणि ईएमई जालंधर संघा दरम्यान खेळला गेला. अति संघर्षपूर्ण खेळात मुंबई कस्टम संघ 1 विरुद्ध 0 अशा गोल फरकाने विजयी ठरला. कस्टम मुंबई संघाच्या मोहरकर प्रज्वल याने खेळाच्या 28 व्या मिनिटाला संघासाठी एकमात्र गोल केला.
आजचा चौथा सामना पंजाब पोलीस जालंधर आणि डेक्कन हैदराबाद संघादरम्यान खेळला गेला. पंजाब पोलिसांनी हैदराबाद संघाचा 6 विरुद्ध 2 गोल फरकाने धुव्वा उडवला. खेळाच्या 7 व्या मिनिटाला शेख शैबाज याने मैदानी गोल करत हैदराबाद संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण पुढे जे घडलं ते विचित्रच घडलं. पंजाब पोलीसातर्फे परतफेड करत गोलांची बरसात करण्यात आली. करणबीर सिंघ (12 व्या आणि 15 व्या) आणि वरिंदरसिंघ ( 11 व्या व 57 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर शमशेर सिंघ याने 19 व्या आणि अजय कुमार यांने 36 व्या मिनिटाला गोल करत हैदराबाद संघाला नामवले. हैदराबाद संघातर्फे मोहम्मद अब्दुल आलिम याने शेवटच्या 58 व्या मिनिटाला गोल करून सावरण्याचा प्रयत्न केला.
आजचा गेलाशेवटचा सामना सायंकाळी सैफई हॉस्टल इटावा आणि चारसाहेबजादा अकाडेमी नांदेड संघादरम्यान खेळला गेला. इटावा संघाने 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या गोल फरकाने विजयाची नोंद करून घेतली.
आजच्या सामन्यात पंच म्हणून अय्याज हनीफ खान, गौरव कुमार अमरजीतसिंघ, हार्दिक भोसले, मोहम्मद सरदार खान, अरुण दीनानाथ सिंघ, धीरज पृथ्वीराज चव्हाण, सुमित मोहिते, इंदरपाल सिंघ यांनी काम पाहिले. हॉकी टूर्नामेंट कमेटीचे अध्यक्ष स. गुरमीत सिंघ नवाब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेळाचे संचालन केले.