देश विदेश

राधेश्याम मोपलवार MSRDC च्या जबाबदारीतून मुक्त, लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय चर्चांना उधाण

 

मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेले मधूर संबंध आणि निवृत्तीनंतरही मिळालेल्या मुदतवाढीमुळे सातत्याने चर्चेत असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी गायकवाड यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार उद्या सूत्रे स्वीकारतील.

सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे २०१७ मध्ये महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सेवानिवृत्त होताच त्यांना फेब्रुवारी २०१८ पासून सलग पाच वर्षे सातवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मोपलवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पायभूत प्रकल्पांसह नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी केली. फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये सलग सातवेळा विक्रमी मुदतवाढ मिळालेले मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत. गायकवाड हे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांच्याकडे एमएसआरडीसीच्या सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

दरम्यान, राधेश्याम मोपलवार यांनी पदावरुन हटवण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील वॉररुमच्या माध्यमातून राज्यातील अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी रस्ते आणि विकास महामंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार हा निर्णय झाला असावा, असे मोपलवार यांनी म्हटले. मोपलवार यांना या पदावर यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता मोपलवार यांच्याच विनंतीवरून त्यांनी या पदावर आणखी मुदतवाढ घेतली नाही. त्यामुळे मोपलवारांना या पदावरून हटवले, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले.

मोपलवार लोकसभा निवडणूक लढवणार?

फडणवीस सरकार, महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस अशा तिन्ही सरकारच्या काळात राधेश्याम मोपलवार हे सत्ताधाऱ्यांचे विश्वासू ठरले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी २०१८ मधील निवृत्ती नंतरही रेकॉर्ड ब्रेक सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.

गेल्या काही दिवसांपासून राधेश्याम मोपलवार हे राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. मोपलवार हे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते नांदेड किंवा हिंगोली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button