देशात लॉकडाऊन लागणार नाही! डॉक्टरांनी दिली दिलासादायक माहिती
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजविला आहे. चीनमधील ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट बीएफ-7 ने आता हिंदुस्थानात प्रवेश केला आहे. गुजरात आणि ओडिशा येथे या व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळले आहेत.
यामुळे सरकारी यंत्रणा अॅलर्ट झाली असून, बैठकांचे सत्र सुरू आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा कोरोनाचे संकट घोंघावू लागले असल्याने देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. या प्रश्नाचे डॉक्टरांनी उत्तर दिले असून त्यांनी हिंदुस्थानच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे.
देशात सध्या लॉकडाऊन करावा लागणार नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ अनिल गोयल यांनी म्हटले की ‘देशात लॉकडाऊनची परिस्थिती असणार नाही कारण देशातील 95% नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हिंदुस्थानी नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती चिनी लोकांपेक्षा मजबूत आहे.’ असं असलं तरी हिंदुस्थानला चाचणी, उपचार, ट्रेसिंग या कोरोनाच्या मूलभूत गोष्टींकडे परतण्याची गरज आहे असे डॉ.गोयल यांनी सांगितले.